आरसीबी संघाचा चौथा विजय 

  • By admin
  • April 13, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

लिफिल सॉल्ट, विराट कोहलीची धमाकेदार अर्धशतके, यशस्वी जयस्वालचे आक्रमक अर्धशतक व्यर्थ 

जयपूर ः फिलिप सॉल्ट (६५) आणि विराट कोहली (नाबाद ६२) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने राजस्थान रॉयल्स संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. आरसीबी संघाने आयपीएल स्पर्धेत चौथा विजय साकारत गुणतालिकेत ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 

आरसीबी संघासमोर विजयासाठी १७४ धावांचे आव्हान असताना फिल सॉल्ट व अनुभवी विराट कोहली या सलामी जोडीने बहारदार फटकेबाजी करत ९२ धावांची सलामी दिली. फिलीप सॉल्टची खेळी अतिशय वेगवान होती. त्याने ३३ चेंडूत ६५  धावा फटकावत संघाचा विजय सुकर बनवला. त्याने आक्रमक फटकेबाजी करताना तब्बल सहा उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. ही भागीदारी कुमार कार्तिकेय याने सॉल्टला बाद करुन संपुष्टात आणली. नवव्या षटकात आरसीबीला पहिला धक्का बसला असला तरी तोपर्यंत संघाचा विजयी मार्ग भक्कम बनलेला होता. 

विराट कोहली याने देवदत्त पडिक्कल समवेत नाबाद ८३ धावांची भागीदारी करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीने ४५ चेंडूत नाबाद ६२ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व चार चौकार मारले. पडिक्कल याने २८ चेंडूत नाबाद ४० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. या जोडीने १७.३ षटकात एक बाद १७५ धावा फटकावत नऊ विकेटने विजय साकारला. एकमेव विकेट कुमार कार्तिकेय याने घेतली. 
राजस्थान रॉयल्स चार बाद १७३ धावा
यशस्वी जयस्वालच्या आक्रमक अर्धशतकाच्या मदतीने राजस्थान रॉयल्स संघाने आरसीबीसमोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वीने शानदार फलंदाजी केली आणि ४७ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला २० षटकांत चार गडी बाद १७३ धावा करण्यात यश आले. राजस्थानकडून यशस्वी व्यतिरिक्त ध्रुव जुरेलने २३ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३५ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाची सुरुवात संथ झाली. यशस्वी आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात ४९ धावांची भागीदारी झाली. पण कृणाल पंड्याने सॅमसनला बाद करून राजस्थानला पहिला धक्का दिला. १९ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने १५ धावा काढून सॅमसन बाद झाला. त्यानंतर यशस्वी आणि रियान पराग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या पण यश दयालने रियान याला बाद केले. रायनने २२ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.

यशस्वीने सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि हंगामातील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. यशस्वी एका टोकापासून डाव सांभाळत होता, पण हेझलवूडने यशस्वीला पायचीत बाद करून राजस्थानला तिसरा धक्का दिला. या सामन्यात शिमरॉन हेटमायर मोठी खेळी खेळू शकला नाही आणि भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. शिमरॉन नऊ धावा करून बाद झाला. शेवटी, जुरेलने शानदार फलंदाजी केल्याने राजस्थानला १७० धावांचा टप्पा ओलांडता आला. एका चेंडूवर चार धावा काढून नितीश राणा नाबाद राहिला. आरसीबीकडून भुवनेश्वर, यश दयाल, जोश हेझलवूड आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *