
करुण नायरची तुफानी खेळी व्यर्थ, शेवटचे तीन फलंदाज धावबाद झाल्याने दिल्लीचा पहिला पराभव
दिल्ली : करुण नायरच्या ८९ धावांच्या चक्रीवादळ खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल स्पर्धेतील पाचवा विजय नोंदवण्याच्या स्थितीत पोहोचला होता. परंतु, दिल्लीचे तीन फलंदाज धावबाद झाले आणि मुंबई इंडियन्स संघाने १२ धावांनी रोमांचक विजय साकारत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. मुंबईचा हा केवळ दुसरा विजय आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान होते. दिल्ली संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. दीपक चहर याने पहिल्याच चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्क याला शून्यावर बाद केले. त्यानंतर करुण नायर व अभिषेक पोरेल या जोडीने स्फोटक फलंदाजी करत ११९ धावांची भागीदारी करत सामन्यावर संघाची पकड घट्ट केली. करुण नायर याने तुफानी फलंदाजी करत अवघ्या ४० चेंडूत ८९ धावा फटकावल्या. सँटनर याने नायरला क्लीन बोल्ड करुन संघाला मोठा दिलासा दिला. करुण नायर याने १२ चौकार व पाच षटकारांची वादळी खेळी करुन पुन्हा एकदा निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. पोरेल याने २५ चेंडूत ३३ धावा फटकावल्या. पोरेल याने तीन चौकार व एक षटकार मारला.
करुण नायर बाद झाल्यानंतर अक्षर पटेल (९) व स्ट्रिस्टन स्टब्स (१) हे लवकर बाद झाले. त्यानंतर आशुतोष शर्मा (१७), विप्रज निगम (१४) यांनी संघाला विजयासमीप आणले. परंतु, विप्रज याला सँटनर याने बाद केले. पाठोपाठ आशुतोष धावबाद झाला. त्यामुळे सामन्यात पुन्हा रोमांचक स्थिती निर्माण झाली. कुलदीप यादव (०) धावबाद झाल्यानंतर मुंबई संघात जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले. मोहित शर्मा (०) याला धावबाद करुन मुंबई संघाने १२ धावांनी रोमांचक विजय नोंदवला. दिल्लीचे शेवटचे तीन फलंदाज धावबाद झाले आणि त्यांना आयपीएल स्पर्धेत पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली. कर्ण शर्मा (३-३६), मिशेल सँटनर (२-४३) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. दिल्ली संघ १९ षटकात १९३ धावांवर सर्वबाद झाला.
तिलक वर्माची शानदार फलंदाजी

आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात तिलक वर्माने दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करत २०५ धावांचा मोठा स्कोर केला. चालू हंगामात मुंबईने सलग दुसरा सामना खेळला आहे ज्यामध्ये २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या सामन्यात तिलक वर्माने ३३ चेंडूत ५९ धावांची तुफानी खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि उत्तुंग ३ षटकारही मारले.
तिलक वर्माचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने आरसीबी संघाविरुद्धच्या सामन्यात ५६ धावा केल्या होत्या. आता त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना चिरडून ५९ धावा केल्या. तिलक वर्माने आयपीएल २०२५ च्या ६ सामन्यांमध्ये आता २१० धावा केल्या आहेत. त्यामध्ये २ अर्धशतकीय डावांचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ७५ धावांवर रायन रिकेल्टनची विकेट पडली तेव्हा तिलक वर्मा फलंदाजीला आला. प्रथम, त्याने सूर्यकुमार यादवसोबत ६० धावांची भागीदारी केली. या सामन्यात सूर्याने २८ चेंडूत ४० धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पांड्या लवकर बाद झाला पण अखेर त्याने आणि नमन धीरने ६२ धावांची भागीदारी केली. नमनने १७ चेंडूत ३८ धावांची तुफानी खेळी केली.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील
या अर्धशतकी खेळीच्या जोरावर तिलक वर्मा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. सूर्याने आतापर्यंत २३९ धावा केल्या आहेत. सध्या, लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे, ज्याने आतापर्यंत ३४९ धावा केल्या आहेत.
दिल्ली संघाकडून कुलदीप यादव (२-२३) व विप्रज निगम (२-४१) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मुकेश कुमारने ३८ धावांत एक गडी बाद केला.