
फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या सत्राचे शानदार उद्घाटन
पुणे ः जागतिक बुद्धिबळ क्षेत्रामध्ये भारतीय महिलांनी देखील चमकदार कामगिरी केली आहे. पुण्यात होत असलेल्या फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेत देखील भारतीय महिला नक्कीच वर्चस्व गाजवतील, अशी अपेक्षा अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेचे उद्घाटन नितीन नारंग व स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षा परिणिता फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, खजिनदार विलास म्हात्रे, एमसीएचे मानद सचिव व स्पर्धा संचालक निरंजन गोडबोले, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे आणि चीफ आरबीटर इव्हान सायरोवही आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सध्याची जागतिक रॅपिड विजेती आणि ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेती भारताची ग्रँडमास्टर कोनेरु हंपी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली व ग्रँडमास्टर वैशाली आर, आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांच्यासह चीनची ग्रँडमास्टर झू जीनर, रशियाची आंतरराष्ट्रीय मास्टर पोलिना शुव्हालोहा, पोलंडची आंतरराष्ट्रीय मास्टर एलिना कॅशलीनस्काया, बल्गेरियाची आंतरराष्ट्रीय मास्टर सालिनोव्हा न्यूरघ्युन, मंगोलियाची आंतरराष्ट्रीय मास्टर बॅट खुयाक व जॉर्जियाची आंतरराष्ट्रीय मास्टर मेलिना सॅलोम या खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला.
नितीन नारंग पुढे म्हणाले की, बुद्धिबळ हा आत्मविश्वास बुद्धिमत्ता या विविध कौशल्याचे प्रतीक असून यामध्ये सातत्याने कामगिरी करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तत्त्वानुसार खेळामध्ये एक तर तुम्ही विजय मिळवता किंवा त्यापासून नवीन काहीतरी गोष्टी आत्मसात करतात खेळामध्ये हार कधीही नसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या दहा वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. विशेषतः बुद्धिबळामध्ये अनेक खेळाडू पुरुष व महिला या दोन्ही गटात जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करीत आहेत. डी गुकेश याने मिळवलेले विश्वविजेतेपद हे त्याचे द्योतक आहे, असे स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षा परिणिता फुके यांनी सांगितले.
सिद्धार्थ मयूर यांनी आभार मानले. कलायन या संस्थेतर्फे गणेश वंदना तसेच बुद्धिबळातील विविध मोहरांच्या धर्तीवर आकर्षक नृत्य सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सरकार, पर्सिस्टंट सिस्टीम, बिसलेरी यांनी स्पर्धा पुरस्कृत केली आहे.
या स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धिबळपटूंमध्ये चुरशीच्या लढती रंगणार असून यामध्ये भारताची रॅपिड बुद्धिबळ जगज्जेती ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, ग्रँड मास्टर द्रोणावल्ली हरिकाव ग्रँड मास्टर आर.वैशाली, विशेष प्रवेशिकेद्वारे संधी मिळालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख (वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश) या आंतरराष्ट्रीय खेळाडू भारताचे आव्हान सांभाळणार आहेत. ही स्पर्धा अमनोरा द फर्न येथे २४ एप्रिलपर्यंत चालणार आहे.