
पुणे-मुंबईच्या उदयोन्मुख बॉक्सिंग खेळाडूंनी केले एकत्रित सराव व प्रशिक्षण
पुणे ः पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून स्पारिंग ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यात पुणे व मुंबई येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पारिंग ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पुणे व मुंबईच्या खेळाडूंनी एकत्रित ट्रेनिंग घेतले व सराव केला. या प्रसंगी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. अविनाश बागवे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रात मोठ्या स्पर्धा होत नसल्याने अनेक चांगल्या खेळाडूंचे नुकसान होत आहे. नवीन खेळाडू समोर येत नाही. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना यांचे अस्तित्व नसल्याने स्पर्धा होत नाही. त्यामुळे खेळाडूंना खूप कमी स्पर्धा अथवा फक्त निवड चाचणी खेळण्याची संधी मिळते. स्पारिंग ट्रेनिंग प्रोग्राम हा वेगवेगळ्या जिल्ह्यातील गुणवान खेळाडूंना एकत्रित ट्रेनिंग व सराव करण्याची संधी मिळावी यासाठी आहे. आगामी काळात पुणे शहर, पुणे ग्रामीण, मुंबई, ठाणे, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात असे उपक्रम हाती घ्यावे. जेणेकरुन खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळले असे अविनाश बागवे यांनी सांगितले.
या प्रसंगी मुंबईचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कृष्णा दास यांनी ट्रेनिंग स्पारिंग कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय गुजर यांचे हा ट्रेनिंग स्पारिंग कार्यक्रम घेऊन यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले. या प्रसंगी पुणे शहर, पुणे जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारचे उपक्रम उदयोन्मुख खेळाडूंसाठी उपयुक्त ठरू शकतील. त्यामुळे असे उपक्रम सातत्याने राबवले जावेत असे सचिव विजय गुजर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, सलमान शेख, सुरेशकुमार गायकवाड, जीवनलाल निंदाने, अशोक मेमजादे, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष मदन वाणी, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, कैलास गायकवाड, प्रदीप वाघे, दिलीप मोरे, हितेश निंदाने आदी उपस्थित होते.