कम्बाइंड बँकर्स, महावितरण, आर्किटेक्ट संघांचे विजय

  • By admin
  • April 14, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : इनायत अली, प्रवीण क्षीरसागर, अविष्कार ननावरे सामनावीर

छत्रपती संभाजीनगर : ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत कम्बाइंड बँकर्स, महावितरण अ संघ आणि इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात चमकदार कामगिरी बजावत सय्यद इनायत अली, प्रवीण क्षीरसागर, अविष्कार ननावरे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित शहीद भगतसिंग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळवल्या गेलेल्या उप उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या सामन्यात कम्बाइंड बँकर्स संघाने इंडियन मेडिकल असोसिएशन संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात महावितरण ‘अ’ संघाने इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. अत्यंत झालेल्या चुरशीच्या तिसऱ्या सामन्यात गुड इयर संघाने कॉस्मो फिल्म्स संघावर ११ धावांनी विजय संपादन केला.

सामनावीर पुरस्कार मसिआ संघाचे ज्येष्ठ खेळाडू संदीप भंडारी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे नॅशनल कमिटी सदस्य निलेश चव्हाण व डॉ प्रशांत याकुंडी यांच्या हस्ते देण्यात आला.

पहिला सामना कंबाईंड बँकर्स व इंडियन मेडिकल असोसिएशन या संघांदरम्यान खेळवण्यात आला. कम्बाइंड बँकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशन संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात केवळ ६३ धावातच गारद झाला. यामध्ये एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. कम्बाइंड बँकर्स संघातर्फे गोलंदाजी करताना सय्यद इनायत अली याने केवळ १८ धावात ६ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तर सय्यद आरिफने १० धावात २ गडी तर किरण लहाने व केतन शर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात कम्बाइंड बँकर्स संघाने विजयी लक्ष केवळ ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये इंद्रजीत उढान याने ७ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह १९ धावा, केतन शर्मा याने १८ चेंडूत २ चौकारांसह १२ धावा तर सय्यद इनायत अली याने १० चेंडूत २ चौकारांसह १० धावांचे योगदान दिले. इंडियन मेडिकल असोसिएशन संघातर्फे गोलंदाजी करताना आमेर बदाम याने १५ धावात २ गडी तर मशदुल सय्यद व अर्सलम शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

दुसरा सामना महावितरण ‘अ’ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर या संघा दरम्यान खेळविण्यात आला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर संघ १८ षटकात सर्वबाद १०२ धावाच करू शकला. त्यामध्ये हिमांशू देशपांडे याने २४ चेंडूत १ षटकार व ५ चौकारांसह ३८ धावा, निलेश चव्हाण याने १५ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह १८ धावा तर सचिन ताकतोंडे याने १८ चेंडूत १० धावांचे योगदान दिले. महावितरण ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना प्रवीण क्षीरसागर याने भेदक व अप्रतिम गोलंदाजी करताना केवळ १३ धावांत ५ महत्त्वपूर्ण गडी बाद केले तर स्वप्नील चव्हाण याने १३ धावांत २ गडी, मधुर कचरे याने १९ धावांत २ गडी तर कर्णधार प्रदीप चव्हाण याने ६ धावात १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात महावितरण ‘अ’ संघाने विजयी लक्ष केवळ १० षटकात एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये कर्णधार स्वप्नील चव्हाण याने सर्वाधिक २६ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ७ चौकारांसह ५० धावा, ज्ञानेश्वर पाटील याने १२ चेंडूत २ षटकार व ३ चौकारांसह २५ धावा व स्वप्नील चव्हाण याने १९ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह १९ धावांचे योगदान दिले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर संघातर्फे गोलंदाजी करताना निलेश चव्हाण याने २१ धावात एक मात्र गडी बाद केला.

तिसरा सामना गुड इयर व कॉस्मो फिल्म्स या संघांदरम्यान खेळविण्यात आला. गुड इयर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या. यामध्ये अरविंद याने ३३ चेंडूत १ षटकार व ८ चौकारांसह ४८ धावा, कर्णधार जितेंद्र निकम याने १९ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह २० धावा, दीपक यादव याने २६ चेंडूत २ चौकारासह १९ धावा तर सुनील जाधव याने १७ चेंडूत १ चौकारासह ११ धावांचे योगदान दिले. कॉस्मो फिल्म्स संघातर्फे गोलंदाजी करताना रामेश्वर मतसागर याने २६ धावात २ गडी, व्यंकटेश सोनवाल याने १२ धावात २ गडी कर्णधार विराज चितळे याने ७ धावात २ गडी तर धनंजय जाधव याने १२ धावात १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात कॉस्मो फिल्म्स संघ १८ षटकात ११८ धावातच गारद झाला. यामध्ये सनी राजपूत याने २७ चेंडू २ षटकार व ३ चौकारांसह ३३ धावा, व्यंकटेश सोनवलकर याने १३ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २० धावा, भास्कर जिवरग याने १० चेंडूत ३ चौकारांसह १६ धावा तर कर्णधार विराज चितळे याने १६ चेंडूत १ चौकारासह १४ धावांचे योगदान दिले. गुड इयर संघातर्फे गोलंदाजी करताना अविष्कार ननावरे याने अप्रतिम व भेदक गोलंदाजी करताना केवळ १९ धावात ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. त्याला साथ देत सचिन शेंडगे याने १९ धावात २ गडी कर्णधार जितेंद्र निकम याने ३७ धावात २ गडी तर परवेझ सय्यद याने १९ धावात १ गडी बात केला तर दोन फलंदाज धावचित झाले.

या सामन्यात पंचाची भूमिका अजय देशपांडे, विशाल चव्हाण, कमलेश यादव, हसन जमा खान, सुनील बनसोडे तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.

शुक्रवारी होणारे उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने

होमिओपॅथिक डॉक्टर्स व कॅनेरा बँक (सकाळी ७.३० वाजता), ऋचा इंजिनिअरिंग व बजाज ऑटो (सकाळी ११ वाजता), वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ व वन विभाग (दुपारी २ वाजता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *