सलग पाच पराभवानंतर चेन्नईचा विजय

  • By admin
  • April 14, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

लखनौ संघावर पाच विकेटने मात; धोनी-दुबेची शानदार भागीदारी निर्णायक

लखनौ : कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद २६) आणि शिवम दुबे (नाबाद ४३) यांच्या नाबाद ५७ धावांच्या भागीदारीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा पाच विकेट राखून पराभव केला. सलग पाच पराभवानंतर चेन्नई संघाने आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे. लखनौ संघाचा हा सलग तीन विजयानंतरचा पराभव आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान होते. युवा सलामीवीर शेख राशीद आणि रचिन रवींद्र या सलामी जोडीने ४.५ षटकात ५२ धावांची आक्रमक भागीदारी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. पहिला आयपीएल सामना खेळताना रशीद याने १९ चेंडूत २७ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार मारले. आवेश खान याने रशीदला बाद केले. त्यानंतर मार्कराम याने रचिन रवींद्र यांची ३७ धावांची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. त्याने पाच चौकार मारले. राहुल त्रिपाठी (९), रवींद्र जडेजा (७), विजय शंकर (९) हे आक्रमक फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने चेन्नई संघ अडचणीत सापडला.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबे या जोडीने संयमाने परिस्थितीनुसार फटकेबाजी करत लखनौ संघावर दबाव वाढवला. या दबावात लखनौचे गोलंदाज ढेपाळले. त्याचा फायदा उठवत या जोडीने संघाला पाच विकेटने विजय मिळवून दिला. शिवम दुबे याने ३७ चेंडूत नाबाद ४३ धावा फटकावल्या. दुबेने दोन षटकार व तीन चौकार मारले. महेंद्रसिंग धोनी याने केवळ ११ चेंडूत नाबाद २६ धावांची धमाकेदार खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. धोनीने चार चौकार व एक षटकार मारला. धोनीने छोट्याशा पण आक्रमक फलंदाजांनी चाहत्यांना खुश केले. चेन्नईने १९.३ षटकात पाच बाद १६८ धावा फटकावत पाच विकेटने सामा जिंकला. रवी बिश्नोई याने १८ धावांत दोन विकेट घेतल्या.

पंतला फॉर्म गवसला

लखनौ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद १६६ धावसंख्या उभारली. लखनौ संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात मार्कराम अवघ्या ६ धावांवर बाद झाला. त्याने एक चौकार मारला. खलील अहमदने पहिला धक्का दिला. अंशुल कंबोज याने पूरन याला अवघ्या ८ धावांवर तंबूत पाठवून दुसरा मोठा धक्का दिला. या स्पर्धेत धमाकेदार फलंदाजी करणारा पूरन दोन चौकारांसह ८ धावांचे योगदान देऊन बाद झाला. धोनी याने डीआरएस घेऊन पूरन याला तंबूत पाठवले.

मिचेल मार्स व ऋषभ पंत या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करत डाव सावरला. मार्श २५ चेंडूत ३० धावा फटकावत बाद झाला. त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले. जडेजा याने मार्शला क्लीन बोल्ड केले. आयुष बदोनी दोन षटकार व एक चौकार ठोकत २२ धावा काढून बाद झाला. धोनीच्या अचूक फेकीमुळे अब्दुल समद(२०) धावबाद झाला. तत्पूर्वी, समद याने दोन टोलेजंग षटकार ठोकले होते.

गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या ऋषभ पंत याने संघ कठीण परिस्थितीत असताना दमदार अर्धशतक झळकावले. पंत याने ४९ चेंडूंचा सामना करत ६३ धावा फटकावल्या. पंतने चार उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. डेव्हिड मिलर (नाबाद ०), शार्दुल ठाकूर (६) यांनी आपले योगदान दिले. लखनौ संघाने २० षटकात सात बाद १६६ धावसंख्या उभारली.

चेन्नई संघाकडून रवींद्र जडेजा (२-२४) व पाथिराणा (२-४५) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. खलील अहमद (१-३८) व अंशुल कंबोज (१-२०) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *