
रेल्वेची ७८ वी स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः प्रथमेश देगावकर व मिर्झा वसीम बैग सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत प्रथमेश देगावकरच्या ८८ धावांच्या जोरावर साऊथ सोलापूर ओल्ड संघाने स्मॅशर्स थंडर संघावर १२६ धावांनी दणदणीत विजय मिळविला. प्रथमेश सामनावीर ठरला.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात खाजा बंदेनवाज क्रिकेट अकादमीने उस्मानाबाद क्रिकेट क्लबला १०६ धावांनी हरविले. शानदार शतक झळकाविणारा मिर्झा वसीम बेग सामन्याचा मानकरी ठरला. सामनावीर पुरस्कार रणजीपटू रोहित जाधव व सोहेल मुनशी यांच्या हस्ते देण्यात आले. हे सामनावीर पुरस्कार सुदेश मालप व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून चिराग शाह, सुहैल शेख व प्रवीण किनकर तर गुणलेखक म्हणून नितीन गायकवाड व नागेश सुरगीहळ्ळी यांनी काम पाहिले.

संक्षिप्त धावफलक ः १) साऊथ सोलापूर ओल्ड: १६ षटकांत ३ बाद १९७ (प्रथमेश देगावकर ८८, मुरली कार्तिक ४८, अमोल अंगडी २३, इरफान पटेल, अल्मोईज पटेल व समर्थ बिराजदार प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध स्मॅशर्स थंडर : १६ षटकांत ९ बाद ७१ (अल्मोईज पटेल १२, अतुल पवार व अशोक डोंबाळे २ बळी, विश्वनाथ मुंढे, अमोल अंगडी व मुरली कार्तिक प्रत्येकी १ बळी).
२) केबीएनसीए संघ : २० षटकांत ५ बाद १७७ (मिर्झा वसीम बेग ११७, सईद जहागीरदार २२, जावेद शेख व वीरेंद्र जाधव २ बळी, शाकीब शेख १ बळी) विजयी विरुद्ध उस्मानाबाद क्रिकेट क्लब ः १२.१ षटकांत सर्वबाद ७१ (जावेद शेख २५, शाकीब शेख १५, जकवान हबीब व जाहिद पठाण ३ बळी, टी सलमान २ बळी).