
भारतीय खेळाडूंची संमिश्र कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत भारतीय खेळाडूंसाठी पहिला दिवस संमिश्र निकालांचा ठरला. मात्र वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश मिळालेल्या दिव्या देशमुख हिने सालिनोव्हा न्यूरघ्युन हिचा पराभव करत पहिला दिवस गाजवला.
अमनोरा द फर्न येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या हरिका द्रोणावल्ली हिला चीनच्या झू जीनर पराभव पत्करावा लागला.तसेच, वैशाली रमेशबाबू व कोनेरु हंपी या भारतीय खेळाडूनीअमधील पहिल्या फेरीच्या लढत बरोबरीत सुटल्यामुळे पहिला दिवस भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र यशाचा ठरला.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या अन्य एका लढतीत सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या पोलिना शुव्हालोहाने एलिना कॅशलीनस्काया वर झुंजार विजय मिळवत आजचा दिवस गाजवला. आजच्या अखेरच्या निकाली सामन्यात मंगोलियाच्या मुनगुंतूल बॅट खुयाकने जॉर्जियाच्या मेलिना सॅलोमचा पराभव करून १ गुणांची कमाई केली.
सालिनोव्हा न्यूरघ्युनविरुद्धच्या लढतीत दिव्या देशमुख हिने इंडियन डिफेन्सने दावास सुरुवात केली. पहिल्या वेळ मर्यादेपर्यंत पर्यंत दिव्याने वर्चस्व राखले. परंतु दिव्याने ४१व्या चालीत केलेल्या चुकीचा फायदा घेत सालिनोव्हाने उत्कृष्ट बचाव केला. मात्र पराभव टाळण्यात तिला अपयश आले. दिव्याने ५३व्या चालीत निर्णायक विजयाची नोंद केली.
स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ परिणिता फुके आणि सिटी कॉर्पोरेशनचे संचालक आदित्य देशपांडे यांनी पहिलचाल करताना स्पर्धेचे समारंभपूर्वक उद्घाटन केले.
यावेळी परिणिता फुके म्हणाल्या की, बुद्धिबळ हा प्राचीन काळापासून मूळ भारतीय क्रीडा प्रकार असून या खेळाला सार्वत्रिक रित्या प्रोत्साहन दिले पाहिजे.महिला सबलीकरणासाठी भारतात सध्या सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू असून इतक्या उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे समाजातील सर्व वर्गातील महिलांना प्रेरणा मिळणार आहे. ही स्पर्धा आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद झाला आहे.
पहिल्या फेरीचे निकाल
मुनगुंतूल बॅट खुयाक (मंगोलिया) विजयी विरुद्ध मेलिना सॅलोम (जॉर्जिया), झू जीनर (चीन) विजयी विरुद्ध हरिका द्रोणावल्ली (भारत), एलिना कॅशलीनस्काया (पोलंड) पराभूत विरुद्ध पोलिना शुव्हालोहा (रशिया), सालिनोव्हा न्यूरघ्युन (बल्गेरिया) पराभूत विरुद्ध दिव्या देशमुख (भारत), वैशाली रमेश बाबू (भारत) बरोबरी विरुद्ध कोनेरू हंपी (भारत).