
पुणे ः महाराष्ट्राने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या खेलो मास्टर्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बास्केटबॉल खेळात ५० वर्षांवरील गटात उपविजेतेपद पटकावले.
शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिल्ली संघाला चिवट लढत दिली. मात्र दिल्लीने हा सामना ४७-४३ असा केवळ चार गुणांनी जिंकून अजिंक्यपद पटकाविले. मध्यंतराला दिल्ली संघाकडे २३-२१ अशी दोन गुणांची आघाडी होती. दिल्लीकडून अजय महाराज व रहीन शेख यांनी कौतुकास्पद खेळ केला तर महाराष्ट्राकडून आनंद कुलकर्णी, नितीन चपळगावकर, सुरेश शेलार, अरविंद घाटे, योगेश खेर, प्रफुल्ल हिरे व अतुल पुरोहित यांनी चिवट लढत दिली.