
नागपूर : इंफाळ (मणिपूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या होणाऱ्या राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा अधिकृत प्रतिनिधी संघ नागपूर येथून इंफाळकडे रवाना झाला. या संघात राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या गुणवत्ताधारक शालेय खेळाडूंना संधी देण्यात आली असून, संपूर्ण संघ विजयी कामगिरीच्या निर्धाराने सज्ज झाला आहे.
नागपूर फुटबॉल संघाच्या प्रशिक्षणासाठी सूरज दुबे व एनी लुईस या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडलेले सराव शिबीर अत्यंत यशस्वी ठरले असून खेळाडूंमध्ये आवश्यक तांत्रिक कौशल्य, संघभावना आणि आत्मविश्वास यांचा भक्कम पाया तयार झाला आहे.
संघ व्यवस्थापनाची जबाबदारी क्रीडा अधिकारी स्वप्नील बनसोड आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक निशांत पाटील यांनी यशस्वीरित्या सांभाळली असून हे दोघेही संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून इंफाळला रवाना झाले आहेत.
संघाच्या निरोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील हे उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले की, ‘शालेय पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धा ही खेळाडूंसाठी कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना शिस्त, चिकाटी आणि विजयाची जिद्द कायम ठेवावी.’
जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ‘ही स्पर्धा तुम्हाला केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर पुढील यशस्वी जीवनासाठी घडवणारी शाळा ठरेल. आत्मविश्वासाने खेळा आणि राज्याचे नाव उज्वल करा.’
या राष्ट्रीय शालेय स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील शालेय खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, त्यांच्या कामगिरीतून राज्याचे क्रीडा क्षेत्र निश्चितच गौरवशाली ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.