
फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धा
पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश मिळालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने ग्रँडमास्टर वैशाली आर हिच्यावर सनसनाटी विजय मिळवताना दुसऱ्या फेरीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
अमनोरा द फर्न येथे सुरू असलेल्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत दुसऱ्या पटावरील लढतीत डावाच्या सुरुवातीपासून वर्चस्व गाजवणाऱ्या वैशालीची एकाग्रता क्षणभर भंग पावली आणि तिच्या हातून झालेल्या चुकीचा पुरेपूर फायदा घेत दिव्याने एका गुणाची कमाई केली. हा सामना जेमतेम १ तास चालला.
दिव्या आणि वैशाली यांच्यातील ही लढत रुय लोपेझ पद्धतीच्या डावपेचांनी प्रारंभ झाल्यामुळे रंगतदार ठरणार अशी पहिल्यापासून चिन्हे होती. वैशालीने आपला राजा मध्यावरच ठेवला होता, तर दिव्याने राजाच्या बाजूला कॅसलिंग करून आपले आक्रमक डावपेच स्पष्ट केले होते. सलामीच्या काही चाली अत्यंत वेगाने पार पडल्यानंतर दिव्याने सोळावी चाल अनपेक्षित रित्या अपारंपरिक पद्धतीने केली. त्याचा परिणाम म्हणून वैशालीच्या हातून पुढच्याच चालीला घोडचूक झाली. वैशालीने त्याची भरपाई करण्यासाठी उंटाला मध्ये घालण्याचा प्रयत्न केला. परंतु दिव्याने वजीरावजीरी करून पुढच्याच चालीत तिचा उंटही मारला.
यावेळी वैशाली कडे शिल्लक राहिलेली प्यादी एकमेकां शेजारी नसल्यामुळे एकटी पडली होती. पाठोपाठ दोघींनीही एकमेकींची अनेक मोहरी मारल्यानंतर वैशालीकडे बचावाची संधी राहिली नसल्याने तिने २६व्या चालीला शरणागती पत्करली.
विजयानंतर दिव्या म्हणाली की, मी केलेल्या अनपेक्षित चालीच्या बाबतीत थोडीशी नशीबवान ठरले. हा सामना इतक्या लवकर संपेल अशी माझी अपेक्षा नव्हती. परंतु डाव संपण्यास पाचच मिनिटे बाकी असताना वैशालीने केलेली चूक माझ्या पथ्यावर पडली.

चौथ्या पटावरील लढतीत भारताच्या हरिका द्रोणावल्ली व पोलंडच्या एलिना कॅशलीनस्काया यांच्यातील लढत अत्यंत रंगतदार झाल्यानंतर अखेर बरोबरीत सुटली. एलिना हिने या लढतीत किंग्ज इंडियन बचावाने प्रारंभ केला. परंतु हरिकाने कोणतेही दडपण न घेता आक्रमक चाली करून निर्णायक विजयासाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवून दिले. हरिकाने आपला राजा पटाच्या मध्यावर ठेवून एलिनाच्या आक्रमणाला वजीराच्या बाजूला रोखले. यानंतर दोन्ही खेळाडूंची बहुतांश मोहरी वजीराच्या बाजूला एकवटल्यामुळे डावाची स्थिती समतोल बनली. हा डाव निकाली होणार नसल्याचे पुढच्या चालीची पुनरावृत्ती झाल्यामुळे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य करताना गुण विभागणी केली. यावेळी विशेष म्हणजे दोन प्यादी वगळता दोन्ही खेळाडूंची बाकी सर्व मोहरी सुरक्षित होती.
अन्य लढतीत भारताच्या कोनेरू हंपी व जॉर्जियाच्या मेलिना सॅलोम यांच्यातील सामना ४१ चालीच्या प्रदीर्घ लढतीनंतर अखेर बरोबरीत सुटला. स्कॉच पद्धतीच्या बचावाने दोन्ही खेळाडूंनी डावाला प्रारंभ केल्यानंतर २६व्या ही लढत बरोबरीत चालली होती. परंतु २७व्या चाली पासून ३४व्या पर्यंत दोघींनी एकमेकींची मोहरी मारण्याचा सपाटा लावला. त्यामुळे ४१व्या चाली अखेर दोघींची केवळ राजा, हत्ती व तीन प्यादी पटावर शिल्लक राहिली होती. डाव निकाली होणार नसल्याचे ध्यानात दोघींनीही ४१व्या चालीत बरोबरी मान्य केली. तर, रशियाच्या पोलिना शुव्हालोहा व बल्गेरियाच्या सालिनोव्हा न्यूरघ्युन यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. चीनच्या झू जीनर हिने मंगोलियाच्या मुनगुंतूल बॅट खुयाकचा पराभव करून २ गुणांची कमाई केली.
दुसऱ्या फेरीचे निकाल
मेलिना सॅलोम (जॉर्जिया) बरोबरी विरुद्ध कोनेरू हंपी (भारत), दिव्या देशमुख (भारत) विजयी विरुद्ध वैशाली आर (भारत), पोलिना शुव्हालोहा (रशिया) बरोबरी विरुद्ध सालिनोव्हा न्यूरघ्युन (बल्गेरिया), हरिका द्रोणावल्ली (भारत) बरोबरी विरुद्ध एलिना कॅशलीनस्काया (पोलंड), मुनगुंतूल बॅट खुयाक (मंगोलिया) पराभूत विरुद्ध झू जीनर (चीन).