
गंधर्व गाडगे, स्वराज सावंतची चमकदार कामगिरी
इम्फाळ, मणिपूर : मणिपूरच्या इम्फाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ६८व्या १९ वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांनी सुरुवातीपासूनच आपली ताकद दाखवत दमदार विजय नोंदवले.
महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उत्तर प्रदेशचा २-१ अशा गोलफरकाने पराभव केला. महाराष्ट्रकडून गंधर्व गाडगे याने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात स्वराज सावंतने दुसरा निर्णायक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानेही उत्तम सांघिक खेळ करत उत्तराखंड संघावर १-० असा विजय मिळवला. या विजयानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक सुरजकुमार दुबे, मुलींच्या संघाच्या प्रशिक्षिका ऑनी पॉल, तसेच व्यवस्थापक स्वप्नील बनसोड आणि निशांत पाटील यांचे मार्गदर्शन व व्यवस्थापन यामुळे संघांचे यश घडवता आले, असे मत संघातील खेळाडूंनी व्यक्त केले. या शानदार विजयांनंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ पुढील सामन्यांसाठी सज्ज आहेत