महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील स्कोअररसाठी सुवर्णसंधी 

  • By admin
  • April 16, 2025
  • 0
  • 218 Views
Spread the love

जळगाव ः  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे. 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीची लिंक व अधिक माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटवर व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेचा अचूक दिनांक, स्वरूप आणि पुढील प्रक्रियेची माहिती उमेदवारांना देण्यात येणार आहे. 

जळगाव जिल्ह्यातील गुणवान स्कोअरर्स यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले आहे. त्यासाठी अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व मोहम्मद फजल (७८७५४६६३०३२) यांच्याशी संपर्क साधावा.

या उपक्रमामागील उद्देश राज्यातील प्रत्येक भागातील, ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान स्कोअरर्सना व्यासपीठ उपलब्ध करून देणे असा आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व सर्व अपेक्स कौन्सिल मेंबर्स यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की,  ज्यांना क्रिकेट या खेळाविषयी आवड आहे व बारकावे लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, त्यांच्यासाठी क्रिकेट स्कोअरर म्हणून करिअर करणे हे अत्यंत उपयुक्त आणि समाधानकारक ठरू शकते. याद्वारे विविध स्तरांवर क्रिकेटशी जोडले जाऊन काम करण्याची संधी स्कोअरर्सना मिळू शकते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील प्रतिभावान युवकांना स्वतःची क्षमता दाखविण्याचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” एमसीएतर्फे या उपक्रमाचे समन्वयक कुमार ठक्कर (7249877417) हे असतील.

ज्यांनी मागील वर्षी परीक्षा दिली नव्हती, फक्त त्या नवीन अर्जदारांसाठीच ही लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांनी मागील वर्षी ही परीक्षा दिली आहे, त्यांची केवळ प्रायोगिक परीक्षा घेतली जाईल. प्रायोगिक परीक्षेची वेळ आणि स्थळ लवकरच कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *