
प्रस्तावित २५ एकर जागा तत्काळ हस्तांतरित करण्याची नांदेड ऑलिम्पिक संघटनेची मागणी
नांदेड ः महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके असलेल्या नांदेड शहरात हक्काचे एकही मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे शेकडो खेळाडू विविध खेळापासून वंचित आहेत. जिल्हा क्रीडा संकुल उभारणीसाठी २५ एकर जागा देण्याचा प्रस्ताव रखडला आहे. जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा व २५ एकर जागा हस्तांतरित करावी अशी नांदेड ऑलिम्पिक संघटनेने मागणी केली आहे. या मागणीसाठी नांदेड ऑलिम्पिक संघटना व एकविध क्रीडा संघटना यांच्या माध्यमातून २५ एप्रिलपासून उपोषण करण्यात येणार आहे. संघटनेचे सचिव बालाजी पाटील जोगदंड, कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी, बंटी सोनसळे, गोविंद पांचाळ यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करत इशारा दिला आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानंतर सर्वच बाबतीत नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे तत्कालीन माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मौजे असर्जन (कौठा) येथील गट क्रमांक १११, ११२, ११३, ११४, ११५ संदर्भातील जमीन फेर मोजणी करून २५ एकर जागेचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविला होता. सदर प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई येथे मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहे. सदरचा प्रस्ताव तत्काळ निकाली काढून २५ एकरची जिल्हा क्रीडा संकुलाची जागा जिल्हा क्रीडा संकुल समिती नांदेडला हस्तांतरित करावी अशी मागणी नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने व जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह पालकमंत्री नांदेड अतुल सावे, खासदार अजित गोपछडे, खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण, तसेच मंत्रालयीन स्तरावर संबंधीत सर्व अधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
या निवेदनावर ऑलिम्पिक संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड, कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी, प्रलोभ कुलकर्णी (ॲथलेटिक्स), राहुल वाघमारे (तलवारबाजी), जनार्दन गोपिले (रस्सीखेच), रमण बैनवाड (योगा), डॉ दिनकर हंबर्डे (बुद्धिबळ), रमेश नांदेडकर (खो-खो), विनोद गोस्वामी (बास्केटबॉल), राजेश जांभळे (वुशू), वृषाली पाटील जोगदंड (धनुर्विद्या), जसविंदर सिंग रामगडिया (वेटलिफ्टिंग), ज्ञानेश्वर सोनसळे (सायकलिंग), राष्ट्रपाल नरवाडे (कुराश), अजगर अली पटेल (कबड्डी व आट्यापाट्या), जयपाल रेड्डी (जिम्नॅस्टिक्स व ट्रायथलॉन), विष्णु पूर्णे (कॅडबॉल), मधुकर क्षीरसागर (पॉवरलिफ्टिंग), इम्रान खान (स्केटिंग), कुलदीप सिंग जाट (मलखांब), मनोज जोशी (हँडबॉल), बालाजी सिनेवाड (टेनिक्वाइट), बालाजी जोगदंड (तायक्वांदो), डॉ दिलीप भडके, नवनाथ पोटफोडे, मधुकर कांबळे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.