
मुंबई ः शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर आयोजित आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत सागर वाघमारे व महिला गटात आकांक्षा कदम यांनी विजेतेपद पटकावले.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने मुंबईच्या विकास धारियाला २४-१४, २५-१५ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर २५-७, २५-१५ अशा सरळ दोन सेटमध्ये मात करून विजेतेपद पटकाविले.
महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकर हिने ठाण्याच्या मधुरा देवळेला हरवले. पुरुष गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या अभिजीत त्रिपानकरने ठाण्याच्या पंकज पवारला नमवले. विजेत्या पहिल्या आठ खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव योगेश फणसळकर, कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव, छत्रपती शंभूराजे मंडळाचे मान्यवर पदाधिकारी व प्रमुख पंच सूर्यकांत पाटील उपस्थित होते.
पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल ः विकास धारिया (मुंबई) विजयी विरुद्ध अभिजीत त्रिपानकर (पुणे), सागर वाघमारे (पुणे) विजयी विरुद्ध पंकज पवार (ठाणे)
महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल ः आकांक्षा कदम (रत्नागिरी) विजयी विरुद्ध प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), केशर निर्गुण (सिंधुदुर्ग) विजयी विरुद्ध मधुरा देवळे (ठाणे).