महिला प्रीमियर लीग क्रिकेट ः अनुश्री स्वामी, मीना गुरवे सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महिला प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप टायटन्स संघाने ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स संघावर चार विकेट राखून विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात आरएसआय क्वीन्स संघाने पीएसबीए शक्ती या संघाचा १०३ धावांनी पराभव केला. या सामन्यात अनुश्री स्वामी आणि मीना गुरवे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १४७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना मंगलदीप टायटन्स संघाने १७.२ षटकात सहा बाद १४८ धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात अनुश्री स्वामी हिने ३७ चेंडूंत ६५ धावांची धमाकेदार खेळी केली. आक्रमक फलंदाजी करत तिने ११ चौकार मारले. अनुश्री स्वामी हेन गोलंदाजी देखील आपली चमक दाखवत १२ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला. या अष्टपैलू कामगिरीमुळे अनुश्रीला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुश्रीला क्रिकेट प्रशिक्षक राकेश उबाळे व मोहित परमार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. श्वेता सावंत हिने २७ चेंडूत ४२ धावा काढल्या. तिने नऊ चौकार मारले. श्वेताला प्रशिक्षक राहुल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. श्रुती पवार हिने पाच चौकारांसह ३३ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत मुक्ता मगरे हिने १९ धावांत दोन गडी बाद केले. उत्कर्षा कदम हिने २६ धावांत दोन गडी बाद केले.
आरएसआय क्वीन्स विजयी
आरएसआय क्वीन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच बाद१६७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पीएसबीए शक्ती संघ १६.१ षटकात अवघ्या ६४ धावांत गडगडला. आरएसआय क्वीन्स संघाने १०३ धावांनी सामना जिंकून आगेकूच कायम ठेवली.
या सामन्यात जीया सिंग हिने ५१ चेंडूत ५७ धावा फटकावल्या. तिने आठ चौकार मारले. पायल पवार हिने १९ चेंडूत ३५ धावांची जलद खेळी साकारली. तिने सात चौकार मारले. भूमिका चव्हाण हिने सहा चौकारांसह ३१ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत मीना गुरवे हिने २७ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. रसिका शिंदे हिने २४ धावांत तीन गडी टिपले. ईश्वरी सावकर हिने ७ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः १) ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स ः २० षटकात सात बाद १४७ (दामिनी बनकर ५, श्वेता सावंत ४२, मानसी तिवारी ११, श्रुती पवार ३३, उत्कर्षा कदम २१, इतर ३४, अनुश्री स्वामी ३-१२, मुक्ता मगरे २-१९, तेजश्री ननावरे १-२९, सुरेखा अडे १-३०) पराभूत विरुद्ध मंगलदीप टायटन्स ः १७.२ षटकात सहा बाद १४८ (तेजस्विनी बटवाल ३०, अनुश्री स्वामी ६५, मुक्ता मगरे ६, साक्षी वाघमोडे १२, स्नेहल मगर नाबाद १४, सुरेखा अडे वनाबाद ७, इतर १०, उत्कर्षा कदम २-२६, श्रुती पवार २-२०, श्वेता सावंत १-३३, मयुरी साळुंके १-२८). सामनावीर ः अनुश्री स्वामी.
२) आरएसआय क्वीन्स ः २० षटकात पाच बाद १६७ (जीया सिंग ५७, श्रती गिते २५, निकिता मोरे ११, पायल पवार नाबाद ३५, साक्षी गोरे नाबाद १, इतर ३३, रसाक शिंदे ३-२४, नीती अग्रवाल १-३५, भूमिका चव्हाण १-२९) विजयी विरुद्ध पीएसबीए शक्ती – १६.१ षटकात सर्वबाद ६४ ः रसिका शिंदे ८, भूमिका चव्हाण ३१, पूजा जमधाडे १०, इतर ११, मीना गुरवे ४-२७, ईश्वरी सावकर २-७, संजना वाघमोडे १-१, निकिता मोरे २-११). सामनावीर ः मीना गुरवे.