
सुपर ओव्हरमध्ये राजस्थाननने सामना गमावला, यशस्वी, राणाचे अर्धशतक व्यर्थ
दिल्ली : यशस्वी जयस्वाल (५१), नितीश राणा (५१) यांच्या दमदार फलंदाजीनंतरही राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रोमहर्षक सामना ‘टाय’ झाला. आयपीएल स्पर्धेतील हा पहिला सुपर ओव्हर सामना ठरला. सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने सामना जिंकून आपली घोडदौड कायम ठेवली.
राजस्थान रॉयल्स संघाने सुपर ओव्हरमध्ये ५ चेंडूत दोन बाद ११ धावा काढल्या. त्यानंतर केएल राहुलने एका चौकारासह ७ धावा काढल्या. त्यानंतर स्ट्रिस्टन स्टब्सने संदीपला उत्तुंग षटकार ठोकत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

राजस्थान रॉयल्स संघासमोर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान संघाने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार संजू सॅमसन व यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने धमाकेदार सुरुवात करुन दिली. संजू ३१ धावांवर निवृत्त झाला. संजूने १९ चेंडूंत ३१ धावा फटकावल्या. त्याने तीन उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले. संजू दुखापतीमुळे निवृत्त होऊन मैदानाबाहेर गेला. तेव्हा रियान पराग मैदानात उतरला. पराग याने ८ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेल याने त्याला क्लीन बोल्ड करुन संघाला पहिले यश मिळवून दिले.
दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वाल याने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. यशस्वी याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. यशस्वी जयस्वाल याला कुलदीप यादव याने ५१ धावांवर बाद केले. यशस्वीने ३७ चेंडूंचा सामना करताना चार टोलेजंग षटकार व तीन चौकार मारले.
नितीश राणा आणि ध्रुव जुरेल या जोडीने आक्रमक फटकेबाजी करत ४९ धावांची भागीदारी केली. राणा २८ चेंडूत ५१ धावांची दमदार खेळी करुन बाद झाला. त्याने सहा चौकार व दोन टोलेजंग षटकार मारले. ध्रुव जुरेल याने १७ चेंडूत २६ धावा फटकावल्या. हेटमायर याने नाबाद १५ धावांचे योगदान दिले. शेवटच्या चेंडूवर जुरेल धावबाद झाल्याने सामना टाय झाला. राजस्थान संघाने २० षटकात चार बाद १८८ धावा काढल्या.

दिल्ली कॅपिटल्स १८८ धावा
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने १८८ धावसंख्या उभारली. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेक पोरेल आणि केएल राहुल यांनी सुनियोजित खेळी केली. या डावात कर्णधार अक्षर पटेलनेही ३४ चेंडूंची तुफानी खेळी खेळली आणि दिल्लीला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या ५ षटकांत ७० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सकडून जेक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी डावाची सुरुवात केली. मॅकगर्कचा खराब फॉर्म सुरूच राहिला कारण त्याने दोन चौकार मारले पण ९ धावा काढून बाद झाला. अभिषेक पोरेलने ३७ चेंडूत ४९ धावा केल्या. गेल्या सामन्यात ४० चेंडूत ८९ धावांची तुफानी खेळी करणारा करुण नायर यावेळी आपले खातेही उघडू शकला नाही.
केएल राहुलने ३२ चेंडूत ३८ धावांची खेळी करत दिल्ली संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. दुसरीकडे, ट्रिस्टन स्टब्स दिल्ली संघासाठी सतत फिनिशरची भूमिका बजावत आहे. स्टब्सने १८ चेंडूत ३४ धावांची नाबाद खेळी केली. शेवटी, आशुतोष शर्मानेही नाबाद १५ धावा करून आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोठे योगदान दिले.
अक्षर पटेलची वादळी फलंदाजी
१४ व्या षटकात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेल फलंदाजीला आला. दिल्लीने १०५ धावांवर ४ विकेट गमावल्या असताना तो फलंदाजीला आला. अशा परिस्थितीत पटेलने फक्त १४ चेंडूत ३४ धावांची तुफानी खेळी केली. या डावात त्याने ४ चौकार आणि २ षटकारही मारले. एकेकाळी दिल्लीने १५ षटकांत ४ गडी गमावून १११ धावा केल्या होत्या. येथून दिल्लीच्या खेळाडूंनी शेवटच्या ५ षटकांत वादळी पद्धतीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ७८ धावा केल्या.