
डॉ संजय रोडगे यांचा नागरी सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा थाटात संपन्न
सेलू ः सेलू येथे डॉ संजय रोडगे नागरी सत्कार समिती सेलू यांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ साई नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेलू-जिंतूर विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे होते. विशेष उपस्थिती म्हणून परभणी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, वाशीमचे माजी आमदार विजय जाधव, सत्कारमूर्ती तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, डॉ सविता रोडगे, स्वागताध्यक्ष गोविंद जोशी, डॉ विनायकराव कोठेकर, महेश पाटील, डॉ राम रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, कृउबा समितीचे संचालक अनिल पवार, माऊली ताठे, प्रफुल्ल बिनायाके, अशोक पटवारी, रहीम पठाण, सुरेंद्र तोष्णीवाल, नंदुशेठ बहिवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ ऋतुराज साडेगावकर यांनी केले.
डॉ संजय रोडगे यांनी शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेपासून केलेल्या कार्याची दाखल घेत दैनिक लोकमतच्या वतीने हॉगकॉग येथे “ग्लोबल एक्सलन्स इन एज्युकेशन” या आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्तीबद्दल आज मानपत्र, स्मृतिचिन्ह शाल, श्रीफळ देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमात इस्त्रो युविका अहमदाबाद येथे निवड झालेली तनिष्का तेलभरे, नासा अभ्यासक्रमासाठी निवड झालेली तेजश्री चौधरी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये प्रथम आलेला प्रज्वल रोडगे, होमी भाभा परीक्षेत कांस्यपदक प्राप्त गौरी अबुज आदी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन, मंथन परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, बीडीएस परीक्षा अशा विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
डॉ संजय रोडगे यांचे कार्य शिक्षण, समाजसेवा आणि युवक विकास या क्षेत्रांमध्ये अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे आपण शिक्षणाबरोबरच सामाजिक, आरोग्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय आहात. आज आपण अंतरराष्ट्रीय दर्जाचे विज्ञान भवन, जलतरण तलाव, भव्य प्रेक्षागृह व क्रीडांगण सेलू शहरात उभारण्याच्या दिशेने पुढे जात आहात हे सेलूच्या वाट्याला आलेले सौभाग्य आहे. असे माजी आमदार बोर्डीकर म्हणाले.
ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप डॉ रोडगे यांनी पेटवला आहे. त्यांच्या कार्यात शैक्षणिक गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन दिसून येतो. गावाकडील मुलांमध्येही प्रचंड क्षमता असते, गरज असते ती योग्य संधी आणि प्रेरणेची. डॉ रोडगे यांचे कार्य ही संधी निर्माण करणारी चळवळ आहे.”
सत्कार हा कार्याची कबुली असतो. डॉ रोडगे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची फळं आज दिसत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना घडवणारी माणसं ही समाजासाठी अमूल्य असतात. असे बोलताना माजी आमदार विजय जाधव म्हणाले
आपण देशोदेशीचे अभ्यास दौरे करून इंग्लंड, फिनलँड, सिंगापूर आदी देशातील शिक्षणपद्धती आत्मसात करून आपल्या संस्थांमध्ये प्रभावीपणे राबवल्या. त्याचा परिणाम म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थी इस्त्रो युविकासाठी निवडले जातात, नासा कार्यक्रमात सहभागी होतात, आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकतात. आपल्या शैक्षणिक कार्याची दखल घेत फिनलँड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत २२ देशातील प्रतिनिधींसमोर आपण भारताचे प्रतिनिधित्व केले, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
डॉ रोडगे यांच्या कार्यपद्धतीत वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिकता आणि सेवाभाव आहे. त्यांच्या कामाचे अनुकरण इतरांनी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ प्रताप काळे यांनी केले.
यासह गोविंद जोशी, डॉ विनायकराव कोठेकर, महेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. तसेच डॉ रोडगे यांना दिलेल्या मानपत्राचे शब्दांकन डॉ शरद ठाकर यांचे होते तर मानपत्र वाचन माधव गव्हाणे यांनी केले.
या भव्य नागरी सत्कार कार्यक्रमात डॉक्टर्स असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, सुवर्णकार असोसिएशन, रामा इंटरनॅशनल स्कूल (वाशिम), वकील संघ, पत्रकार संघ, पालक संघ, डॉ संजयदादा मित्र मंडळ, रवळगाव फार्म प्रोडूसर कंपनी, तसेच ई-संघटना यांच्यातर्फे सुद्धा डॉ संजय रोडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे व डॉ वर्षा गिरी यानी केले. रामराव बोबडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ संजय रोडगे नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ ऋतुराज साडेगावकर, रामराव गायकवाड, डॉ शरद ठाकर, कृष्णा काटे, रामेश्वर शेरे, अमोल निकम, रमेश गोरे, भागवत दळवे, जयसिंग शेळके, अभिजीत राजुरकर, मनोज दीक्षित, अन्वर खान पठाण, निशिकांत पाटील, दत्तराव तांबे यांनी परिश्रम घेतले.