
मुनाफ पटेलचा पंचांशी वाद
दिल्ली ः सुपर ओव्हरमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. मात्र, या सामन्यानंतर बीसीसीआयने दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल यांना मोठा दंड ठोठावला आहे. सामन्यादरम्यान त्याचा पंचांशी वाद झाला, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला. मुनाफच्या मॅच फीच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे.
आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, “दिल्ली कॅपिटल्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल यांना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या त्यांच्या संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना एक डिमेरिट पॉइंट देखील मिळाला आहे. मुनाफ पटेल यांनी कलम २.२० अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा स्वीकारला आहे, जो खेळाच्या भावनेविरुद्ध वर्तनाशी संबंधित आहे. त्यांनी मॅच रेफरी यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली. लेव्हल १ च्या आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.”
मुनाफ पटेलचा पंचांशी वाद झाला
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की मुनाफ पटेल चौथ्या पंचाशी झालेल्या एखाद्या गोष्टीवर नाराज होता आणि त्याला मोठ्याने काहीतरी बोलत होता. मुनाफ सीमारेषेवर बसला होता, दिल्लीचे काही खेळाडू पेये घेऊन उभे होते. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात होता की पंच खेळाडूला आत जाऊ देत नसल्याने मुनाफ रागावला होता, याद्वारे मुनाफ मैदानात उपस्थित असलेल्या खेळाडूंना काही संदेश देऊ इच्छित होता.
तथापि, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता होती पण स्टार्कच्या धोकादायक गोलंदाजीमुळे संघाला फक्त बरोबरी करता आली. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये स्टार्कने फक्त ११ धावा दिल्या, ज्या दिल्लीने फक्त ४ चेंडूत पूर्ण केल्या आणि शानदार विजय मिळवला.