
फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धा ः चीनची झू जीनर आघाडीवर
पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत भारताची कोनेरू हम्पी हिने संयुक्त आघाडीवर असलेल्या भारताच्या दिव्या देशमुखवर विजय मिळवला. तर, तिसऱ्या फेरीत आणखी एक महत्वपूर्ण निकालात हरिका द्रोणावल्ली हिने सालिनोव्हा न्यूरघ्युनवर अत्यंत चुरशीच्या सामन्यात मात केली. दरम्यान, चीनच्या झू जीनर हिने मेलिना सॅलोम विरुद्ध बरोबरी साधताना २.५ गुणांसह स्पर्धेत आघाडीचे स्थान मिळवले.
अमनोरा द फर्न येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत कोनेरू हम्पी विरूद्ध दिव्या देशमुख या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सध्याची महिला रॅपिड जगज्जेती कोनेरू हम्पी हिने सातत्यपूर्ण कामगिरीने २६०० एलो गुणांचा टप्पा ओलांडणाऱ्या केवळ ६ महिला खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. आजही इंग्लिश ओपनिंगने प्रारंभ करताना तिने दिव्याला सुरुवातीलाचा विचारत पाडले. दिव्याच्या खेळातील चुकांमुळे हम्पीला फायदा होत गेला. दरम्यान दिव्याचा घोडा एकटा पडल्यामुळे हम्पीने त्याचा बळी घेत आपली स्थिती भक्कम केली. पाठोपाठ हम्पीच्या उंटाच्या जोडीने वजीराच्या बाजूने पुढे सरकणाऱ्या प्याद्याच्या सहाय्याने दिव्याला पेचात पकडले. दिव्याने ५३व्या चालीला शरणागती पत्करली.
विजयानंतर हम्पी म्हणाली की, दिव्याला अपरिचित असलेल्या नव्या इंग्लिश ओपनिंगमुळे मला डावावर वर्चस्व गाजवता आले. ३०व्या चालीनंतर तर मला केवळ माझी मोहरी योग्य पद्धतीने पुढे सरकवणे पुरेसे ठरले.
भारताच्या हरिकाने कॅटलान ओपनिंगने सुरु करत वेगवान आक्रमण केले. झटपट विजयासाठी तिचे प्रयत्न अपयशी ठरले असले तरी.लांबलेल्या डावात ६८चाली नंतर सालिनोव्हा न्यूरघ्युनवर विजयाची नोंद केली.
दुसऱ्या पटावरील लढतीत मंगोलियाच्या मुनगुंतूल बॅट खुयाकने पोलंडच्या एलिना कॅशलीनस्कायाचा पराभव करून २ गुणांची कमाई केली. एलिना आणि मुनगुंतूल या दोघींनीही वजीरा समोरचे प्यादे पुढे हलवून डावाला सुरुवात केली. तेव्हाच ही लढत रंगतदार होईल अशी खात्री पटली. त्यात दोन्ही खेळाडूंनी डावाच्या सुरुवातीला परस्पर विरुद्ध दिशेला कॅस्लिंग करून एकमेकींच्या राजावर थेट आक्रमण सुरू केले.डावाच्या मध्यावर दोन्ही खेळाडूंना आक्रमणाची अनेकदा संधी मिळाली. मात्र, मुनगुंतूलने प्रथम संधी साधताना वजीराच्या बाजूने आक्रमण करताना कोंडी फोडली. त्यातच एलिनाने २३ व्या चालीला प्याद्यांची अदलाबदल केल्यामुळे डावाचा लंबक मुनगुंतूलच्या बाजूला झुकला. ३४ व्या चालीला मुनगुंतूलने वजीर व हत्तीच्या साहाय्याने शहमत करण्याचे डावपेच यशस्वी केल्यावर एलिनाने शरणागती पत्करली. यावेळी मुनगुंतूल म्हणाली की, मी क्वीन्स गॅम्बिट पद्धतीच्या ओपनिंगची चांगली पूर्वतयारी करून तिला आश्चर्य चकित केले. त्यातच डावाच्या मध्यावर निर्माण झालेली परिस्थिती तिला अनपेक्षित होती व त्याचा फायदा मला मिळाला.
चौथ्या पटावरील भारताची वैशाली आणि रशियाची पोलिना शुव्हालोहा यांच्यातील लढत तब्बल ६३ चालींच्या प्रदीर्घ झुंजीनंतर अनिर्णित राहिली. वेगवान प्रारंभ झालेल्या या सामन्यात २० चाली अखेर दोघींनी ही एकमेकांची मोहरी मारण्याचा सपाटा लावला होता. दोघींनी एकमेकांचे वजीरही मारले होते. मात्र, दोघींनीही बरोबरी न करता सामना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर दोघींचेही राजा, हत्ती व दोन प्यादी एवढीच मोहरी शिल्लक राहिल्यावर ६३ व्या चाली अखेर बरोबरी मान्य केली.