ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स, मनी मंत्र स्ट्रायकर्स संघांचे मोठे विजय 

  • By admin
  • April 17, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

महिला प्रीमियर लीग क्रिकेट ः श्वेता सावंत, आरती दासगुडे सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महिला प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स संघाने प्रेमा हिरकनिस संघाचा ३३ धावांनी पराभव केला. दुसऱया सामन्यात मनी मंत्र स्ट्रायकर्स संघाने पीएसबीए शक्तीस् संघावर ११४ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या लढतींमध्ये श्वेता सावंत व आरती दासगुडे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला. 

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एडीसीए क्रिकेट मैदानावर महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा रंगत आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १४३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रत्युत्तरात प्रेमा हिरकनिस संघाने २० षटकात आठ बाद ११० धावा काढल्या. ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स संघाने ३३ धावांनी सामना जिंकून आगेकूच केली. 

या सामन्यात मानसी तिवारी हिने ४० चेंडूत ५३ धावांची दमदार खेळी साकारली. तिने सात चौकार मारले. अंबिका वाटाडे हिने ४२ चेंडूत ४७ धावांची जलद खेळी केली. तिने पाच चौकार मारले. उत्कर्ष कदम हिने २९ चेंडूत ४६ धावांची आक्रमक खेळी केली. तिने सात चौकार मारले.

गोलंदाजीत श्वेता सावंत हिने प्रभावी गोलंदाजी करत अवघ्या १३ धावांत पाच विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीमुळे श्वेता सावंत ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. श्वेताला युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक राहुल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कोमल वाघ हिने २१ धावांत दोन गडी बाद केले. संजीवनी पवार हिने २३ धावांत दोन बळी घेतले.

भक्ती मिरजकरची शानदार फलंदाजी
दुसऱया सामन्यात मनी मंत्र स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच बाद १९२ धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात पीएसबीए शक्तीस् संघ २० षटकात नऊ बाद ७८ धावा काढू शकला. मनी मंत्र संघ ११४ धावांनी विजयी झाला.

या सामन्यात भक्ती मिरजकर याने ९० धावांची धमाकेदार फलंदाजी केली. भक्तीने ५३ चेंडूत ११ चौकार व एक षटकार मारला. यशोदा घोगरे हिने २६ चेंडूत आक्रमक ३४ धावा फटकावल्या. यशोदाने चार चौकार मारले. शितल देशमुख हिने तीन चौकारांसह ३२ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत आरती दासगुडे हिने ५ धावांत ५ विकेट घेऊन सामना गाजवला. आरतीच्या प्रभावी गोलंदाजीने त्यांनी सामना सहजरित्या जिंकला. आदिती लांडे हिने १२ धावांत दोन तर भूमिका चव्हाण हिने १९ धावांत दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः १) ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स ः २० षटकात सात बाद १४३ (दामिनी बनकर ६, श्वेता सावंत ९, मानसी तिवीर ५३, उत्कर्ष कदम ४६, मयुरी साळुंके ५, हेतल शर्मा नाबाद ५, इतर १२, कोमल वाघ २-२१, संजीवनी पवार २-२३, शात्मली क्षत्रिय १-१३, निकिता सांगेकर १-३५, निलोफर खान १-११) विजयी विरुद्ध प्रेमा हिरकनिस ः २० षटकात आठ बाद ११० (शात्मली क्षत्रिय ११, रुचिका निखारे ६, अंबिका वाटाडे नाबाद ४७, संजीवनी पवार २८, प्रेरणा देशमुख ७, श्वेता सावंत ५-१३, अपूर्वा रुपनर २-१९, उत्कर्ष कदम १-११). सामनावीर ः श्वेता सावंत.

२) मनी मंत्र स्ट्रायकर्स ः २० षटकात पाच बाद १९२ (भक्ती मिरजकर ९०, शितल देशमुख ३२, यशोदा घोगरे नाबाद ३४, आरती दासगुडे ६, इतर २७, भूमिका चव्हाण २-१९, रसिका शिंदे १-४०, ओवी मुरकुटे १-१७) विजयी विरुद्ध पीएसबीए शक्तीस् ः २० षटकात नऊ बाद ७८ (स्नेहा जगताप ११, ऋतुजा काळे ३१, पूजा जमधाडे १६, आरती दासगुडे ५-५, अदिती लांडे २-१२, यशोदा घोगरे १-२०, भक्ती मिरजकर १-१७). सामनावीर ः आरती दासगुडे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *