
महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग ः श्वेता माने, मुक्ता मगरे यांच्यावर चार लाखांची बोली
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगामी महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी महिला खेळाडूंची गुरुवारी लिलाव प्रक्रिया झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पाच महिला खेळाडूंवर बोली लावण्यात आली. त्यात श्वेता माने आणि मुक्ता मगरे यांना ४ लाख रुपयांपेक्षा अधिक बोली लावून खरेदी करण्यात आले.

पुण्यात गुरुवारी महिला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया झाली. अष्टपैलू श्वेता माने हिला ४.२० लाख रुपयांची बोली लावून खरेदी करण्यात आले. मुक्ता मगरे हिला चार लाख रुपयांची बोली लावून खरेदी करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या श्वेता माने, श्वेता सावंत, यशोदा घोगरे व माधुरी अघाव अशा पाच खेळाडूंवर बोली लावण्यात आली आणि त्यांना खरेदी करण्यात आले. श्वेता सावंत हिला १.८० लाख, यशोदा घोगरे १.२० लाख व माधुरी अघाव (६० हजार) या रकमेत खरेदी करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अपेक्स कमिटीचे चेअरमन व छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी पाचही महिला खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.