
रत्नागिरी जेट्स संघाने खरेदी केले
अंबाजोगाई ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग स्पर्धेसाठी अंबाजोगाई क्रिकेट अकादमीची खेळाडू अनुश्री स्वामीची रत्नागिरी जेट्स या संघाने निवड केली आहे.
अंबाजोगाई क्रिकेट अकादमीत नियमित सराव करून महाराष्ट्रात आपले नाव उंचावणारी अनुश्री स्वामी ही खूप मेहनती खेळाडू आहे. अनुश्री हिने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सीनियर निमंत्रित स्पर्धेत एकदिवसीय सामन्यात १४० चेंडूत २४६ धावांची खेळी करून निवड समितीचे लक्ष वेधले.
अनुश्री स्वामी ही महाराष्ट्र २३ वर्षांखालील संघात खेळत आहे. अनुश्रीला प्रशिक्षक राकेश उबाळे, मोहित परमार, माही परमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अनुश्री हिचे वडील बँकेत कर्मचारी आहेत. आई आणि वडिलांचा पाठींबा असल्यामुळे अनुश्रीला हे यश मिळाले असे अनुश्रीने सांगितले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वूमन महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेसाठी अनुश्रीला रत्नागिरी जेट्स या संघाने खरेदी केले. या संघाची कर्णधार भारतीय संघाची प्रमुख खेळाडू स्मृती मानधना आहे. प्रथमच निवड झालेली अनुश्री आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरले असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.
अनुश्रीच्या निवडीबद्दल राकेश उबाळे, माही परमार, मोहित परमार, सुरज कांबळे, तानाजी देशमुख, शुभम लखेरा, अनंत कर्नावट, संतोष कदम, हरीश रुपडा, राजेंद्र देशपांडे, डॉ असद जानूला, ऍड अजित लोमटे, किरण सारुख, योगेश स्वामी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.