
महिला प्रीमियर लीग टी २० क्रिकेट ः अनुश्री स्वामी, शाल्मली कस्तुरियाची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील महिला क्रिकेटच्या क्षेत्रात उत्साह आणि स्पर्धेचा नवा अध्याय लिहिणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महिला प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत आरएसआय क्वीन्स, ओरियन सिटी केअर, मंगलदीप टायटन्स आणि मनी मंत्र या संघांनी दमदार खेळ करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात मंगलदीप टायटन्स आणि प्रेमा हिरकर्णीस संघ आमने-सामने आले. प्रेमा हिरकर्णीस संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १७० अशी मजबूत धावसंख्या उभी केली. सलामीवीर किरण नवगिरे हिने फटकेबाजी करत ११ चेंडूत २१ धावा केल्या, तर कर्णधार अंबिका वाताडे हिने संयमी खेळ करत ५ चौकारांसह २८ धावा फटकावल्या.

त्यानंतर शाल्मली कस्तुरिया हिने अप्रतिम खेळी करत ४४ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७४ धावा काढल्या. त्यांना निकिता संगेकरचा १६ धावांचा आधार लाभला. परंतु इतर फलंदाज मात्र टिकू शकल्या नाहीत. मंगलदीप टायटन्सकडून अनुश्री स्वामी हिने उत्कृष्ट मारा करत ३ बळी घेतले, तर कर्णधार मुक्ता मगरे व कल्याणी खंडागळे यांनी प्रत्येकी २ व १ गडी बाद केले.

१७१ धावांच्या पाठलागासाठी मैदानात उतरलेल्या मंगलदीप टायटन्स संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर तेजस्विनी बटवाल शून्यावर माघारी परतली. मात्र, त्यानंतर अनुश्री स्वामी हिने ९ चौकारांसह ४६ धावांची खेळी करत डावाला आकार दिला. कर्णधार मुक्ता मगरे (१७) आणि साक्षी वाघमोडे (१३) यांनीही मोलाची भर घातली.
या सामन्यात चमकदार खेळी साकारणारी तेजश्री ननावरे हिने ३६ चेंडूत ९ चौकार मारत नाबाद ६४ धावा करत संघाला ३ गडी राखून विजय मिळवून दिला. गोलंदाजीत प्रेमा हिरकर्णीस संघाच्या शाल्मली कस्तुरिया हिने २ बळी घेतले, तर किरण नवगिरे, संजीवनी पवार आणि निकिता संगेकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात शानदार फलंदाजी व अचूक गोलंदाजी करणाऱ्या अनुश्री स्वामी हिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक
शनिवार (१९ एप्रिल) रोजी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. सकाळी ८ वाजता आरएसआय क्वीन्स विरुद्ध ओरियन सिटी केअर तर दुपारी २ वाजेनंतर मंगलदीप टायटन्स विरुद्ध मनी मंत्र यांच्यात लढत होईल. या सामन्यांकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले असून अंतिम फेरीत कोणते संघ धडक मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महिला क्रिकेटमध्ये झळकणाऱ्या नव्या दमाच्या खेळाडूंनी संधीचे सोनं करत चाहत्यांचे मन जिंकले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी अजय भवलकर, अमित भोसेकर, किशोर निकम, दीपक पाटील, प्रियंका गारखेडे, प्रजा भवलकर आणि समृद्धी भोसेकर पुढाकार घेत आहेत.