
छत्रपती संभाजीनगर ः गरवारे कम्युनिटी सेंटर व छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने खुली जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवारी (२० एप्रिल) येथील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे करण्यात आले आहे.
या निवड चाचणी स्पर्धेतून पहिल्या चार गुणवंत खेळाडूंची निवड आगामी ओपन महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी केली जाईल. ही स्पर्धा नवीनतम फिडे नियमांतर्गत होणार आहे. या स्पर्धेत निवड करण्यात आलेल्या विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येईल. तसेच विविध वयोगटातील (मुले व मुली) विजेते व महिला गटात सर्वोत्तम कामगिरी पारितोषिके ठेवण्यात आली आहे.
सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे देण्यात येईल. स्पर्धकांनी आपली उपस्थिती स्पर्धा ठिकाणी २० एप्रिल सकाळी १० वाजेपर्यंत नोंदवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ही निवड चाचणी स्पर्धा फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी खेळाडूंसाठी खुली राहील.
स्पर्धा शुल्क ३०० रुपये ठेवण्यात आले असून नोंदणीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.