
पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात गोलंदाजांची प्रभावी कामगिरी
बंगळुरू : पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या सामन्यात गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने आरसीबी संघावर पाच विकेटने विजय नोंदवत आयपीएल स्पर्धेत पाचवा विजय साकारला. या विजयाने पंजाब संघाने १० गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.
पंजाब किंग्ज संघासमोर विजयासाठी केवळ ९६ धावांचे आव्हान होते. मात्र, प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग ही सलामी जोडी आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाली. प्रियांश आर्य ११ चेंडूत १६ धावा काढून बाद झाला. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. प्रभसिमरन सिंग दोन चौकारांसह १३ धावांचे योगदान देऊन तंबूत परतला.

दोन बाद ३२ अशा स्थितीत कर्णधार श्रेयस अय्यर व जोश इंगलिश या जोडीवर मोठी जबाबदारी होती. मात्र, अय्यर (७) व इंगलिस (१४) या दोघांना हेझलवुड याने एकाच षटकात बाद करुन पंजाबला मोठा धक्का दिला. ५३ धावांवर त्यांचे चार फलंदाज तंबूत परतले होते. शशांक सिंग (१) देखील लवकर बाद झाला. वधेरा याने १९ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी करुन संघाचा विजय निश्चित केला. त्याने तीन षटकार व तीन चौकार मारले. स्टोइनिस याने विजयी षटकार मारला. हेझलवुड (३-१४), भुवनेश्वर (२-२६) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. पंजाबने १२.१ षटकात पाच बाद ९८ धावा फटकावत पाच गडी राखून सामना जिंकला.
आरसीबीची फलंदाजी गडगडली
टिम डेव्हिडच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) पंजाब किंग्जसमोर विजयासाठी ९६ धावांचे लक्ष्य ठेवले. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीची फलंदाजी खूपच खराब होती, पण शेवटी डेव्हिडने २६ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला १४ षटकांत नऊ गडी गमावून ९५ धावा करण्यात यश आले. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येक डावात १४ षटके खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. कारण त्यांचा अर्धा संघ ३३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीचा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही आणि संघाच्या विकेट नियमित अंतराने पडत राहिल्या. टिम डेव्हिड वगळता फक्त कर्णधार रजत पाटीदारलाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. पाटीदार १८ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २३ धावा काढून बाद झाला. डेव्हिड याने शेवटच्या षटकात ब्रारच्या गोलंदाजीवर २० धावा फटकावत अर्धशतक पूर्ण केले. डेव्हिडच्या फटकेबाजीने आरसीबीला ९५ धावसंख्या उभारता आली. पंजाबकडून अर्शदीप सिंग, मार्को जानसेन, युजवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर झेवियर बार्टलेटला एक विकेट मिळाली.
पाटीदारच्या हजार धावा पूर्ण
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने या सामन्यात २३ धावा काढताना आयपीएल स्पर्धेत १ हजार धावा पूर्ण केल्या. पाटीदार याने त्यासाठी ३० डाव खेळले आहेत. १००० आयपीएल धावांसाठी सर्वात कमी डावात हा टप्पा पूर्ण करणारा पाटीदार हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. साई सुदर्शनने २५ डावांत ही कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर (३१ डावा), रुतुराज गायकवाड (३१ डाव), तिलक वर्मा (३३ डाव) या भारतीय फलंदाजांनी देखील कमी डाव खेळून १ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.