
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजन, लिलावात ६५८ खेळाडूंचा सहभाग

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) व विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल) २०२५ साठीचा खेळाडू लिलाव पुणे येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. या लिलावाद्वारे राज्यभरातील उदयोन्मुख आणि प्रतिभावान क्रिकेटपटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले आहे. या लिलावात रजनीश गुरबानी व तेजल हसबनीस हे सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू ठरले.

या वर्षीच्या लिलावासाठी ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघांचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली. पुरुष विभागात रजनीश गुरबानी या वेगवान गोलंदाजावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने सर्वाधिक ५,२०,००० रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. महिला विभागात तेजल हसबनीस हिच्यावर पुष्प सोलापूर संघाने ४,४०,००० रुपयांची सर्वाधिक बोली लावली.

या हंगामात एमपीएलमध्ये ६ संघ आणि डब्ल्यूएमपीएलमध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
लिलावाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार, मानद सचिव ॲड कमलेश पिसाळ, एमपीएल चेअरमन सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, राजू काणे, सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, सीईओ अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघमालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्र प्रीमियर लीग हा केवळ एक स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात व तळागाळात क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हावा, होतकरू व गुणी खेळाडूंना आपले टॅलेंट दाखवण्याचा प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने सुरू झालेल्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघ मालकांचा मोलाचा वाटा आहे. आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एमपीएल देशातील सर्वात लोकप्रिय आणि व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये अग्रस्थानावर असेल.”
मानद सचिव ॲड कमलेश पिसाळ यांनी नमूद केले की, “दरवर्षी नव्या खेळाडूंच्या आणि संघाच्या सहभागामुळे या स्पर्धेचा आलेख दरवर्षी वाढत आहे, हे स्पष्ट होते. विशेषतः महिला विभागातील प्रतिसाद हा उत्साहवर्धक आहे. अनेक नवोदित खेळाडू या माध्यमातून राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास आहे.”
एमपीएल २०२५ सहभागी संघ
१. ४ एस पुणेरी बाप्पा
२. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स
३. रत्नागिरी जेट्स
४. ईगल नाशिक टायटन्स
५. सातारा वॉरियर्स
६. रायगड रॉयल्स
वुमन्स एमपीएल सहभागी संघ
१. पुणे वॉरियर्स
२. रत्नागिरी जेट्स
३. पुष्प सोलापूर
४. रायगड रॉयल्स