
६ संघांच्या नियमाला छेद देण्यासाठी एक नवीन युक्ती वापरली गेली
लंडन ः १२८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार आहे. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेट सामने टी २० स्वरूपात खेळवले जातील. जगभरातील फक्त ६ संघच या क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतील अशी घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रेट ब्रिटन संघ ऑलिंपिकमध्ये पुनरागमन करणार असल्याची एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. या मुद्द्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि स्कॉटलंड क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा सुरू आहे.

स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रुडी लिंडब्लाड यांनी इंग्रजी माध्यम चॅनेल बीबीसीशी बोलताना सांगितले की, स्कॉटलंड क्रिकेट व्यवस्थापन ईसीबीशी खूप चांगले संबंध राखत आहे. दोन्ही संघ ऑलिंपिकमध्ये ‘टीम ग्रेट ब्रिटन’ तयार करण्यासाठी एकत्र येण्याचा विचार करत आहेत.
‘टीम ग्रेट ब्रिटन’ ऑलिम्पिकमध्ये खेळणार
सध्याच्या आयसीसी रँकिंगवर नजर टाकली तर, इंग्लंड पुरुषांच्या टी २० रँकिंगमध्ये दुसऱ्या आणि महिलांच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. पण स्कॉटलंडचा पुरुष आणि महिला क्रमवारीत टॉप १० मध्येही समावेश नाही. या संदर्भात, ट्रुडी लिंडब्लाड म्हणाल्या, “या स्पर्धेत फक्त ६ संघ सहभागी होतील, त्यामुळे टीम ग्रेट ब्रिटनची संकल्पना आपल्या दोघांच्याही हिताची असेल.”
स्कॉटलंड बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असेही उघड केले की ईसीबी अधिकाऱ्यांनी या नवीन योजनेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला आहे. त्यांनी असेही सांगितले की इंग्लंड आणि वेल्स २०२६ मध्ये आणि नंतर पुन्हा २०३० मध्ये विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार आहेत. दरम्यान, लॉस एंजेलिस ऑलिम्पिक एक नवीन संधी म्हणून उदयास आले आहे.
पुरुष फुटबॉल संघाचा अपवाद वगळता, युनायटेड किंग्डम मधील खेळाडू ऑलिम्पिक खेळांमध्ये ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व करतात. परंतु ब्रिटिश ऑलिम्पिक असोसिएशन २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांचे सर्व खेळाडू ग्रेट ब्रिटनच्या ध्वजाचे प्रतिनिधित्व करतील असा प्रयत्न करत आहे.