
महिला प्रीमियर लीग क्रिकेट ः ईश्वरी सावकर, अनुश्री स्वामी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महिला प्रीमियर लीगटी २० क्रिकेट स्पर्धेत आरएसआय क्वीन्स आणि मंगलदीप टायटन्स या संघांनी शानदार विजयासह स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या उपांत्य लढतींमध्ये लक्षवेधक कामगिरी नोंदवत ईश्वरी सावकर आणि अनुश्री स्वामी यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एडीसीए मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात आरएसआय क्वीन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात दोन बाद १८६ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रत्युत्तरात ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स संघ २० षटकात नऊ बाद ११७ धावा काढू शकला. आरएसआय क्वीन्स संघाने ६९ धावांनी विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात ईश्वरी सावकर हिने तुफानी फलंदाजी केली. ईश्वरीने अवघ्या ६६ चेंडूत १०४ धावांची दमदार खेळी करुन मैदान गाजवले. तिने शतकी खेळीत तब्बल १४ चौकार ठोकले. जिया सिंग हिने ४५ चेंडूत ५६ धावा फटकावत आक्रमक अर्धशतक साजरे केले. तिने नऊ चौकार मारले. श्वेता सावंत हिने २० चेंडूत २६ धावांची वेगवान खेळी केली. तिने चार चौकार मारले.
फलंदाजीत मैदान गाजवणाऱ्या ईश्वरी सावकर हिने गोलंदाजीत आपली चमक दाखवत २१ धावांत तीन विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीमुळे तिला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मीना गुरवे (१-११) व लक्ष्मी यादव (१-९) यांनी अचूक मारा करत प्रत्येकी एक बळी मिळवला.
मंगलदीप टायटन्सची दमदार फलंदाजी
दुसऱ्या उपांत्य सामन्यात मंगलदीप टायटन्स संघाने मनी मंत्र स्ट्रायकर्स संघावर दहा विकेट राखून विजय नोंदवत अंतिम फेरी गाठली. मनी मंत्र स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात आठ बाद ११० धावा काढल्या. मंगलदीप टायटन्स संघाने १६ षटकात बिनबाद १११ धावा फटकावत दहा विकेट राखून सामना जिंकला.

या सामन्यात अनुश्री स्वामी हिने फलंदाजीतील सातत्य कायम ठेवत ५९ चेंडूत ७० धावांची धमाकेदार खेळी केली. अनुश्रीने आपल्या वेगवान खेळीत १० चौकार ठोकले. निधी शंभवानी हिने ३० चेंडूत ३४ धावा फटकावल्या. तिने पाच चौकार मारले. तेजस्विनी बटवाल हिने दोन चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत साक्षी वाघमोडे हिने ११ धावांत दोन विकेट घेऊन आपली चमक दाखवली. जितेश्री डमाळे हिने ९ धावांत एक तर मुक्ता मगरे हिने १३ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः १) आरएसआय क्वीन्स ः २० षटकात दोन बाद १८६ (जिया सिंग ५६, ईश्वरी सावकर नाबाद १०४, ज्ञानदा निकम ७, पायल पवार नाबाद १, इतर १८, उत्कर्षा कदम १-३५) विजयी विरुद्ध ओरियन सिटी केअर चॅम्पियन्स ः २० षटकात नऊ बाद ११७ (अनिशा बिक्कड १८, श्वेता सावंत २६, श्रुती पवार ११, उत्कर्षा कदम २५, मयुरी साळुंके १०, इतर २०, ईश्वरी सावकर ३-२१, मीना गुरवे १-११, लक्ष्मी यादव १-८, संजना वाघमोडे १-२८). सामनावीर ः ईश्वरी सावकर.
२) मनी मंत्र स्ट्रायकर्स ः २० षटकात आठ बाद ११० (भक्ती मिरजकर १२, निधी शंभवानी ३४, यशोदा घोगरे ११, संस्कृती घोरतळे नाबाद १३, मधुरा दायमा नाबाद १, इतर २०, साक्षी वाघमोडे २-११, मुक्ता मगरे १-१३, अनुश्री स्वामी १-२४, जितेश्री डमाळे १-९) पराभूत विरुद्ध मंगलदीप टायटन्स ः १६ षटकात बिनबाद १११ (अनुश्री स्वामी नाबाद ७०, तेजस्विनी बटवाल नाबाद २४). सामनावीर ः अनुश्री स्वामी.