
स्पर्धेत १३ देशातील खेळाडू झुंजणार
पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत १३ देशातील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेली स्पर्धा अमनोरा हॉल या ठिकाणी २० ते २८ एप्रिल दरम्यान रंगणार आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या बुद्धिबळ स्पर्धेत यजमान भारतासह अर्मेनिया, अमेरिका, इंडोनेशिया, स्लोवाकिया, जॉर्जिया, रशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बेलारूस, किरगिझस्थान, उझबेकिस्तान, इजिप्त अशा १३ देशांमधील अव्वल बुद्धिबळपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले आणि ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी सांगितले की, जगभरातील दर्जेदार खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यात एकत्रितपणे पाहणे रोमांचकारी ठरणार आहे. केवळ अनुभवी ग्रँडमास्टर खेळाडूंनाच नव्हे तर गुणवान व उदयोन्मुख बुद्धिबळपटूंनाही एकत्रितपणे आपले कौशल्य दाखवण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने ९ फेऱ्यांमध्ये होणार असून जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे) नव्या नियमानुसार खेळली जाणार आहे. स्पर्धेत एकूण ३०,००,००० रुपयांची पारितोषिक रक्कम असलेली ही स्पर्धा भारतातील सर्वाधिक पुरस्कार रक्कमेच्या स्पर्धांपैकी एक ठरणार आहे.
या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता, वेंकटेश एमआर, कार्तिकेयन पी, दीपसेन गुप्ता, चंदा संदीपन, आयुष शर्मा, निलेश सहा, या भारतीय खेळाडूंबरोबरच अर्मेनियाचे ग्रिगोरियन केरन व मॅन्युअल पेट्रोश्यान, जॉर्जियाचे बोरिस स्वचिन्को, स्टेनी जीए, लेव्हल पँटस सुलायला व फॅनी किडज टॉनिके, बेलारूसचे टेट्रेव्ह व्हिटॅली, पेड्रोव्ह ॲलेकसी आणि एफगेणी पॅडेल चिनको, व्हिएतनामचा इंग्यूएन व्हॅन ह्युय, उझबेकिस्तानचा झुमाएव्ह मॅरेट आणि स्लोव्हाकियाचा मॅनिक मिकुलस यांचा समावेश आहे.
आतंरराष्ट्रीय आरबीटर श्रीवत्सन आर हे स्पर्धेचे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. जगभरातील अव्वल खेळाडूंसह गुणवान व भारतीय खेळाडूंच्या सहभागामुळे या स्पर्धेची रंगत वाढणार असून भारतीय बुद्धिबळाचे जागतिक बुद्धिबळाच्या नकाशावरील स्थान अधोरेखित होणार आहे.