
शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः मिलिंद पाटील, दिनकर काळे, साई चौधरी, हरमीतसिंग रागी चमकले

छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत जिल्हा वकील अ संघ, शहर पोलिस आणि कम्बाइंड बँकर्स या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच कायम ठेवली. कम्बाइंड बँकर्स संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या लढतींमध्ये दिनकर काळे, साई चौधरी व हरमीत सिंग रागी यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित शहीद भगतसिंग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात जिल्हा वकील ‘अ’ संघाने वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघावर ४२ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात शहर पोलिस संघाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संघावर ७ गडी राखून मोठा विजय संपादन केला. कम्बाइंड बँकर्स संघाने रुचा इंजिनिअरिंग संघावर ८९ धावांनी विजय नोंदवला.
पहिला सामना जिल्हा वकील ‘अ’ व वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ या संघांदरम्यान खेळवण्यात आला. वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जिल्हा वकील ‘अ’ संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १४५ धावा केल्या. यामध्ये हिंदुराव देशमुख याने सर्वाधिक २७ चेंडूत २ षटकार व ५ चौकारांसह ४४ धावा, कर्णधार मोहित घाणेकर याने १७ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २९ धावा, ओम जाधव याने २५ चेंडूत ३ चौकारांसह २५ धावा तर निरंजन चव्हाण याने १२ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २२ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना सुरज वाघ याने २९ धावात २ गडी तर कर्णधार सतीश माने, अनिल थोरे व राहुल भालेराव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघ १७ षटकांत सर्वबाद १०३ धावा करू शकला. यामध्ये अनिरुद्ध शास्त्री याने ३२ चेंडूत ६ चौकारांसह ३३ धावा, साई डहाळे याने १३ चेंडूत ३ चौकारांसह २० धावा, अनिल थोरे याने ११ चेंडूत २ चौकारांसह १२ धावा तर राहुल भालेराव याने १३ चेंडूत १ चौकारासह १० धावांचे योगदान दिले. जिल्हा वकील ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना दिनकर काळे याने अप्रतिम व भेदक गोलंदाजी करताना केवळ ७ धावात ६ महत्वपूर्ण गडी बाद केले. तर कर्णधार मोहित घाणेकर याने २१ धावांत ३ गडी व निरंजन चव्हाण याने १३ धावात १ गडी बाद केला.

दुसरा सामना शहर पोलिस व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या संघांदरम्यान खेळविण्यात आला. शहर पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १०८ धावा केल्या. यामध्ये अतुल बोर्डे याने २० चेंडूत ३ चौकारांसह २६ धावा, प्रशांत मस्के याने २३ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १७ धावा, कुणाल मिसाळ याने १३ चेंडूत १ चौकारासह १६ धावा तर संतोष शेळके याने २५ चेंडूत २ चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले. शहर पोलिस संघातर्फे गोलंदाजी करताना साई चौधरी याने १६ धावात ३ गडी, आर्यन शेजुळ, पांडुरंग गजे व सुदर्शन एखंडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला तर दोन फलंदाज धावचित झाले.
प्रत्युत्तरात शहर पोलिस संघाने विजयी लक्ष केवळ ११ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये आर्यन शेजुळ याने २४ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ५ चौकारांसह ३८ धावा,शेख जिलानी याने २२ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह ३५ धावा, सुदर्शन एखंडे याने १३ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १६ धावा तर दीपक चव्हाण याने ८ चेंडूत २ चौकारांसह ११ धावांचे योगदान दिले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संघातर्फे गोलंदाजी करताना मस्के, लखन दुलगज व अतुल बोर्डे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तिसरा सामना कम्बाइंड बँकर्स व रुचा इंजिनिअरिंग या संघादरम्यान खेळवण्यात आला. कम्बाइंड बँकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १७७ धावा केल्या. यामध्ये सय्यद इनायत अली याने २६ चेंडूत ८ चौकारांसह ४१ धावा, मिलिंद पाटील याने ४० चेंडूत २ चौकारांसह ३६ धावा, हरमितसिंग रागी याने २४ चेंडूत ३ चौकारांसह ३० धावा तर सय्यद अरिफ याने १० चेंडूत ३ चौकारांसह १७ धावांचे योगदान दिले. रुचा इंजीनियरिंग संघातर्फे गोलंदाजी करताना मयंक विजयवर्गीय व तुळशीराम देशमुख यांनी प्रत्येकी २ गडी तर ऋषिकेश कदम व लहू लोहार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात रुचा इंजिनिअरिंग संघ १४ षटकात सर्वबाद ८८ धावा करू शकला. यामध्ये सचिन नायर याने १७ चेंडूत ५ चौकारांसह २३ धावा, सोहम नरवडे याने २२ चेंडूत ३ चौकारांसह २७ धावांचे योगदान दिले. कम्बाइंड बँकर्स संघातर्फे गोलंदाजी करताना हरमितसिंग रागी याने १२ धावांत ३ गडी, सय्यद आरिफ याने २३ धावात २ गडी, अभिषेक ठेंगे याने ६ धावात २ गडी, कर्णधार शाम लहाने याने १४ धावात १ गडी तर २ फलंदाज धावचित झाले.
या सामन्यात पंचाची भूमिका अजय देशपांडे, यासेर सिद्दिकी, सुनील बनसोडे, विशाल चव्हाण, महेश सावंत व कमलेश यादव तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
रविवारी होणारे सामने
गुड इयर व वन विभाग (सकाळी ७.१५ वाजता)
शहर पोलीस व जिल्हा वकील ‘अ’ (सकाळी ११ वाजता)
महावितरण ‘अ’ व कॅनेरा बँक (दुपारी २ वाजता)