लखनौ सुपर जायंट्स संघाचा रोमहर्षक विजय 

  • By admin
  • April 19, 2025
  • 0
  • 1 Views
Spread the love

आवेश खानची घातक गोलंदाजी, १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे धमाकेदार आयपीएल पदार्पण 

जयपूर : वेगवान गोलंदाज आवेश खान (३-३७) याने शेवटचे षटक अत्यंत प्रभावी आणि अचूक टाकत लखनौ सुपर जायंट्स संघाला राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध दोन धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. यशस्वी जयस्वालची धमाकेदार ७४ धावांची खेळी व्यर्थ ठरली. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून केलेले आयपीएल पदार्पण चर्चेचा विषय बनले आहे. 

राजस्थान रॉयल्स संघासमोर विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य होते. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचे मुख्य कारण होते वैभव सूर्यवंशी. पहिला आयपीएल सामना खेळत असताना वैभव याने पहिल्याच चेंडूवर पुढे सरसावत शार्दुल ठाकूर याला ८० मीटरचा षटकार ठोकून क्रिकेट जगताला चकीत केले. त्यानंतर वैभवने वेगवान गोलंदाज आवेश खान याला पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकले. तीन चेंडूंत वैभवने दोन षटकार ठोकून आपली क्षमता दाखवून दिली. वैभव आणि यशस्वी या जोडीने ८५ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय सुकर बनवला. नवव्या षटकात वैभव २० चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. त्याने तीन टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले. पाठोपाठ नितीश राणा (८) स्वस्तात बाद होऊन तंबूत परतला. १० षटकात राजस्थान संघाने दोन बाद ९४ धावा काढल्या होत्या. 

यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रियान पराग या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी (६२) भागीदारी करत संघाचा विजय सुकर बनवला. आवेश खान याने यशस्वीला क्लीन बोल्ड करुन सामन्यात थोडी रंगत आणली. यशस्वीने ५२ चेंडूत ७४ धावा फटकावल्या. आक्रमक अर्धशतकी खेळी करताना यशस्वीने चार टोलेजंग षटकार व पाच चौकार मारले. रियान पराग याला आवेश याने त्याच षटकात पायचीत बाद केले. परागने ३९ धावा काढल्या. त्याने तीन चौकार व दोन षटकार मारले. डावातील १८व्या षटकात यशस्वी व रियान असे आक्रमक फलंदाज तंबूत परतल्याने राजस्थान संघ अडचणीत सापडला. 

लखनौ पाच बाद १८० धावा 

एडन मार्करामचे अर्धशतक आणि आयुष बदोनीच्या अर्धशतकाच्या मदतीने लखनौने राजस्थानसमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत पाच गडी गमावून १८० धावा केल्या. त्यांच्यासाठी, मार्कराम आणि बदोनी व्यतिरिक्त अब्दुल समदने १० चेंडूत ३० धावांची दमदार खेळी केली. राजस्थानकडून वानिंदू हसरंगाने दोन तर जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी एक विकेट घेतली.
या सामन्यात लखनौची सुरुवात खराब झाली. जोफ्रा आर्चर याने मिचेल मार्शची विकेट घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या. त्यानंतर संदीप शर्माने निकोलस पूरन याला एलबीडब्ल्यू बाद केले. त्याला फक्त ११ धावा करता आल्या. त्याच वेळी, कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने फक्त तीन धावा केल्या.

त्यानंतर, एडेन मार्करम आणि आयुष बदोनी यांनी परिस्थितीनुसार फलंदाजी करत डाव सावरला. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ७६ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, मार्करामने ४५ चेंडूत ६६ धावा आणि बदोनीने ३४ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच वेळी, डेथ ओव्हर्समध्ये अब्दुल समदची बॅट गर्जना करत होती आणि त्याने फक्त १० चेंडूत ३०० च्या स्ट्राईक रेटने ३० धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने एकूण २७ धावा केल्या. डेव्हिड मिलर सात धावांवर नाबाद राहिला.

वैभवचा कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार 

रॉब क्विनी (आरआर), केव्हॉन कूपर (आरआर), आंद्रे रसेल (केकेआर), कार्लोस ब्रॅथवेट (डीडी), अनिकेत चौधरी (आरसीबी), जावोन सेर्ल्स (केकेआर), सिद्धेश लाड (मुंबई इंडियन्स), महेश थेक्षाना (सीएसके), समीर रिझवी (सीएसके), वैभव सूर्यवंशी (आर आर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *