
रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः रोशन परते सामनावीर
सोलापूर ः मुंबईच्या मध्य रेल्वे मेकॅनिक परेल इन्स्टिट्यूट संघाने मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन ब गट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
सोलापूर येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात परेल वर्कशॉप संघाने ख्वाजा बंदेनवाज क्रिकेट अकादमीवर ५ गडी राखून विजय मिळविला. ख्वाजा बंदेनवाज क्रिकेट अकादमीचा डाव परेल संघाने ८८ धावांत गुंडाळला.

विजयी लक्ष्य परेल संघाने ५ गडी गमावत गाठले. अष्टपैलू कामगिरी करणारा रोशन परते सामन्याचा मानकरी ठरला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश मालप व सुनील मालप यांच्याकडून देण्यात आले. पंच म्हणून नवीन माने व सचिन गायकवाड यांनी तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले.
तत्पूर्वी, या अंतिम सामन्याचे उद्घाटन व नाणेफेक सीटीआय वाय के फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सीटीआय एम एस सलवडे, आर के गुप्ता, इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी किशोर पिल्ले, अंबादास तोरा, वैभव इराबत्ती, परेल वर्कशॉपचे रमेश ढाले उपस्थित होते. सूत्रसंचालन राजा पटेल यांनी केले.
अ गटाचे सामने २३ एप्रिलपासून सुरू होतील. हे सामने ४० षटकांचे आहेत. दोन्ही स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाचे बक्षिस वितरण अ गटाच्या अंतिम सामन्यावेळी होईल.
संक्षिप्त धावफलक ः केबीएनसीए : १५.२ षटकांत सर्वबाद ८८ (वसीम बेग १९, जावेद अहमद १८, समीर शेख १४ धावा, रोशन परते ३ बळी, रीशब शर्मा व सौरभ भंडारी २ बळी, अभिषेक शर्मा व शांतापा जलपुर प्रत्येकी १ बळी) पराभूत विरुद्ध परेल वर्कशॉप मुंबई : १७ षटकांत ५ बाद ८९ (निशांत शिवलकर ३४, रोशन परते १८, राहुल सावंत १० धावा, सईद जहागीरदार, सलमान तांबोळी, जाहिद पठाण व जकवान हबीब प्रत्येकी १ बळी).