
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची घोषणा
इस्लामाबाद ः चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला गेला नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवावी लागली. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतात संघ पाठवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा बनला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी जाहीर केले की त्यांचा संघ भारतात होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. यावर्षी हायब्रिड मॉडेलला मान्यता मिळाल्याने त्यांचा संघ स्पर्धेतील सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळेल असे नक्वी म्हणाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकत्याच संपलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय पुरुष संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता, त्यानंतर संघाने अंतिम सामन्यासह त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले.
आम्ही तटस्थ ठिकाणी खेळू – नक्वी
जर भारत किंवा पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत असतील तर ते त्यांचे सामने हायब्रिड मॉडेलच्या धर्तीवर खेळतील यावर एकमत झाले. नक्वी म्हणाले, ज्याप्रमाणे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानमध्ये आपले सामने खेळले नाहीत, त्याचप्रमाणे आम्ही देखील तटस्थ ठिकाणी खेळू. जिथे ठिकाण निश्चित होईल तिथे आम्ही खेळू. जेव्हा करार असतो तेव्हा प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे.
भारत आणि आयसीसीने निर्णय घ्यावा
पीसीबी प्रमुख म्हणाले की, स्पर्धेचे यजमान असल्याने भारत आणि आयसीसीने तटस्थ ठिकाणाचा निर्णय घ्यावा. २९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महिला विश्वचषकाचे आयोजन भारत करणार आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत गतविजेता म्हणून सहभागी होणार आहे. पाकिस्तान महिला संघाने विश्वचषकासाठी ज्या प्रभावी पद्धतीने पात्रता मिळवली त्याबद्दल नक्वी यांनी समाधान व्यक्त केले.
लाहोरमध्ये झालेल्या पात्रता फेरीत पाकिस्तानने आपले पाचही सामने जिंकले. त्यांनी आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज, थायलंड आणि बांगलादेश यांना पराभूत करून मुख्य फेरीसाठी सहज पात्रता मिळवली ज्यासाठी यजमान भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आधीच पात्र ठरले आहेत. घरच्या परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा आणि एक संघ म्हणून कसे खेळायचे हे संघाने दाखवून दिले, असे नक्वी म्हणाले. महिला क्रिकेट संघ चांगली कामगिरी करत आहे याचा मला आनंद आहे.
नक्वी सांगितले की, पीसीबी महिला संघाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल निश्चितच एक विशेष पुरस्कार जाहीर करेल. नक्वी म्हणाले की, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर पीसीबीने आणखी एक आयसीसी स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल त्यांना आनंद आहे.