
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सिद्धांत संजय मोरे याला पुणे येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा झाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत सिद्धांत मोरे याला राज्याचा सर्वात प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिद्धांत मोरे याने वयाच्या १९व्या वर्षी जपान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत पदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारा सिद्धांत भारताचा पहिला खेळाडू ठरला होता. आंतरराष्ट्रीय डायमंड कप विजेता, राष्ट्रीय भारत श्री गटविजेता अशी स्मरणीय कामगिरी सिद्धांत याने केली आहे. कमी वयाच्या शरीरसौष्ठव खेळात नावलौकिक मिळवल्यानंतर सिद्धांत याने चित्रपट क्षेत्रही गाजवले. मराठी चित्रपट शिवा, रुद्र या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिद्धांत याने अनेक वेबसिरीज केलेल्या आहेत. आता सिद्धांत हा दक्षिण भारतीय चित्रपटात आगमन करणार आहे.
या पुरस्काराबद्दल इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस डॉ संजय मोरे, भारती मोरे यांनी सिद्धांतचे अभिनंदन केले आहे.