
युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः जीवन काटकर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १६ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत संघर्ष क्रिकेट अकादमी संघाने नेरळकर क्रिकेट अकादमी संघाचा ५१ धावांन पराभव करत आगेकूच केली. या सामन्यात जीवन काटकर याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल क्रिकेट ग्राउंडवर केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना एकदिवसीय सामना खेळण्याचा चांगला अनुभव प्राप्त होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा युवा खेळाडूंना लाभदायक ठरत असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
या सामन्यात संघर्ष क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघर्ष अकादमीच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत ३४.१ षटकात सर्वबाद १९० धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रत्युत्तरात नेरळकर क्रिकेट अकादमीचा संघ ३२.२ षटकात १३९ धावांवर सर्वबाद झाला. संघर्ष क्रिकेट अकादमीने ५१ धावांनी सामना जिंकत आगेकूच केली.

या सामन्यात अयान अन्सारी याने आक्रमक अर्धशतक साजरे केले. त्याने ६४ चेंडूत ५७ धावांची जलद खेळी साकारली. त्याने आठ चौकार मारले. जीवन काटकर याने अवघ्या ३६ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी केली. जीवनने आपल्या अर्धशतकात दोन षटकार व सहा चौकार मारले. ओम याने ३७ चेंडूत ४१ धावा फटकावल्या. त्याने आठ चौकार ठोकले.
गोलंदाजीत सोहम सपकाळ याने प्रभावी गोलंदाजी करत १७ धावांत तीन विकेट घेऊन सामना गाजवला. जीवन काटकर याने २४ धावांत तीन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी केली. ओम याने ४० धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः संघर्ष क्रिकेट अकादमी ः ३४.१ षटकात सर्वबाद १९० (सोहम सपकाळ १९, अयान अन्सारी ५७, प्रेम जमधाडे २३, ओम ७, जीवन काटकर नाबाद ५०, इतर २३, सोहम कोरवी २-४१, ओम २-४०, अब्दुल हादी मोतीवाला २-२२, यशराज गव्हाड २-४२, वेदांत परदेशी १-२०) विजयी विरुद्ध नेरळकर क्रिकेट अकादमी ः ३२.२ षटकात सर्वबाद १३९ (वेद शर्मा ३३, ओम ४१, आर्यन बन्सवाल १४, अब्दुल हादी मोतीवाला ६, यशराज गव्हाण ५, इतर ३३, सोहम सपकाळ ३-१७, जीवन काटकर ३-२४, ओम १-७, सर्वेश १-१२). सामनावीर ः जीवन काटकर.