
शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः सय्यद तल्हा, शाहेद सिद्दीकी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत वन विभाग, महावितरण अ या संघांनी चुरशीचे विजय नोंदवत आगेकूच केली. जिल्हा वकील अ संघाला पुढे चाल देण्यात आली. या लढतींमध्ये सय्यद तल्हा व शाहेद सिद्दीकी यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला. वन विभाग, जिल्हा वकील अ संघ, महावितरण अ संघ यांनी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म्स प्रायोजित व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित शहीद भगतसिंग क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या अटीतटीच्या सामन्यात वन विभाग संघाने गुड इअर संघावर एका धावेने निसटता विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात शहर पोलिस संघ वेळेवर उपस्थित न राहिल्याने जिल्हा वकील ‘अ’ संघास पुढील चाल देण्यात आली. तिसऱ्या सामन्यात महावितरण अ संघाने कॅनेरा बँक संघावर ३२ धावांनी विजय संपादन केला.

पहिला सामना गुड इयर व वन विभाग या संघांदरम्यान खेळवण्यात आला. गुड इयर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वन विभाग संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १४३ धावा केल्या. यामध्ये यश यादव याने ५३ चेंडूत १२ चौकारांसह ७१ धावा, धनंजय वायभसे याने ३९ चेंडूत २ षटकार व दोन चौकारांसह ४२ धावा, सय्यद तल्हा याने १४ चेंडूत १ चौकारासह ११ धावांचे योगदान दिले. गुड इअर संघातर्फे गोलंदाजी करताना सय्यद परवेझ याने ८ धावात २ गडी, संदीप राठोड याने २८ धावात २ गडी तर कर्णधार जितेंद्र निकम याने १९ धावात १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात अत्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत गुड इयर संघ २० षटकात १४२ धावा काढू शकला. यामध्ये अरुण राजा याने ३३ चेंडूत २ षटकार व ४ चौकारांसह ४३ धावा, सुनील जाधव याने २४ चेंडूत १ चौकारासह १८ धावा, विनोद लंबे याने १४ चेंडूत ३ चौकारांसह १७ धावा तर अविष्कार ननावरे याने ११ चेंडूत १ चौकारासह ११ धावांचे योगदान दिले. वन विभाग संघातर्फे गोलंदाजी करताना सय्यद तल्हा याने १८ धावात ४ महत्वपूर्ण गडी बाद केले तर त्याला साथ देत कर्णधार आनंद गायके याने ३५ धावात २ गडी तर ज्ञानेश्वर मुंडे व सोमनाथ पाचलिंगे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसरा सामना शहर पोलिस व जिल्हा वकील ‘अ’ या संघांदरम्यान खेळविण्यात येणार होता. परंतु, शहर पोलीस संपूर्ण संघ वेळेवर मैदानात उपस्थित न राहिल्याने जिल्हा वकील ‘अ’ संघास पुढे चाल देण्यात आली. तसेच जिल्हा वकील ‘अ’ संघाला पुढे चाल देण्यात आल्याने जिल्हा वकील ‘अ’ संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला.
तिसरा सामना महावितरण अ व कॅनरा बँक या संघा दरम्यान खेळविण्यात आला. महावितरण अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्वबाद १४२ धावा केल्या. यामध्ये पांडुरंग धांडे याने २९ चेंडूत ५ चौकारांसह ३३ धावा, प्रवीण क्षीरसागर याने २६ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २९ धावा, स्वप्नील चव्हाण याने १६ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २७ धावा तर शाहेद सिद्दिकी याने १२ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १६ धावांचे योगदान दिले. कॅनरा बँक संघातर्फे गोलंदाजी करताना श्रीहर्ष पाटील याने ३२ धावात २ गडी आकाश बोराडे याने २१ धावात २ गडी तर कर्णधार ग्यानोजी गायकवाड, राम मंदाडे, ऋषिकेश निकम व सुनील भगत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तर बाकीचे फलंदाज धावचित झाले.
प्रत्युत्तरात कॅनरा बँक संघ १९ षटकात सर्वबाद ११० धावाच करू शकला. यामध्ये आकाश बोराडे याने ११ चेंडूत ३ उत्तुंग षटकार व २ चौकारांसह २८ धावा, सुनील भगत याने २८ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह २२ धावा, ऋषिकेश निकम याने २६ चेंडूत १ चौकारासह २० धावा तर कर्णधार ग्यानोजी गायकवाड व श्री हर्ष पाटील यांनी प्रत्येकी ११ धावांचे योगदान दिले. महावितरण :अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना शाहेद सिद्दिकी याने भेदक व अप्रतिम गोलंदाजी करताना केवळ १६ धावात ६ महत्त्वपूर्ण गडी बाद केले तर पांडुरंग धांडे, प्रवीण क्षीरसागर, स्वप्निल चव्हाण व मधुर कचरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
या सामन्यात पंचाची भूमिका राजेश सिद्धेश्वर, हसन जमा खान, महेश सावंत, सुनील बनसोडे, अजय देशपांडे, विशाल चव्हाण तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
शुक्रवारी होणारे उपांत्य फेरीचे सामने
- जिल्हा वकील ‘अ’ व वन विभाग (सकाळी ७.१५ वाजता)
– कंबाईंड बँकर्स व महावितरण ‘अ’ (सकाळी ११ वाजता)