
जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कबड्डी स्पर्धा
मुंबई ः नवोदित संघ, श्री संस्कृती प्रतिष्ठान, गोलफादेवी, आकांक्षा यांनी जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक १९३ पुरस्कृत अनंतशेठ नागवेकर चषक कुमार गट कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जुनी प्रभादेवी येथील शीला खाटपे मॅटच्या क्रीडांगणावर झालेल्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात एन एम जोशी मार्गच्या नवोदित संघाने वरळीगावच्या श्री साई क्लबचा ४५-२२ असा सहज पाडाव केला. सहाव्या मिनिटाला नवोदित संघाच्या सिद्धेश पाटीलने शिलकी २ गडी टिपत श्री साई संघावर लोण देत १३-०४ अशी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. विश्रांतीला २५-०७ अशी आघाडी नवोदित संघाकडे होती. नंतर सावध खेळ करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्वप्नील पाटील, अथर्व सुवर्णा यांच्या चढाई आणि पकडीच्या उत्कृष्ट खेळाने नवोदित संघाने हा विजय सहज मिळवला. श्री साई संघाचा अरुण पुलवले याने झुंज दिली.
दुसऱ्या सामन्यात श्री संस्कृती संघाने समर्थ स्पोर्ट्स संघाचा कडवा प्रतिकार ४९-३७ असा मोडून काढला. पाचव्या मिनिटाला लोण देत संस्कृतीने १३-०६ अशी आघाडी घेतली. आणखी एक लोण देत संस्कृतीने मध्यंतराला ३१-१५ अशी आघाडी घेतली. पण खरी चुरस नंतर पहावयास मिळाली. समर्थ संघाच्या श्रेयस बेटकरने एकाच चढाईत ३ गडी टिपत संस्कृती संघावर लोण दिला व ही आघाडी २८-३४ अशी कमी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो कमी पडला. अमित वर्मा, दानिश अन्सारी, आयुष कनोजिया यांच्या चतुरस्त्र खेळाने संस्कृती संघाला हा विजय मिळवता आला.
गोलफादेवीने अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात पूर्वार्धातील २४-३२ अशा पिछाडीवरून वीर संताजी संघाचा विरोध ५७-५६ असा संपविला. सुरुवात झोकात कामगिरी करत वीर संताजी संघाने गोलफादेवी संघावर लोण देत १२-०२ अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात ८ गुणांची आघाडी घेणाऱ्या वीर संताजी संघाला दुसऱ्या डावात मात्र त्याची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले. दुसऱ्या डावात गोलफादेवी संघाने आपला खेळ उंचावत हा निसटता विजय मिळवला.
गोलफादेवीच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते सनी कोळी, विनमरा लाड. वीर संताजी संघाच्या अनिकेत विचारेने एका चढाईत ४ गडी टिपत आघाडी मिळविण्यात यश मिळविले होते. त्याला रिजवान शेखची देखील छान साथ लाभली. पण त्याचे विजयात रूपांतर करण्यात ते कमी पडले. या सामन्यात दोन्ही संघांनी गुणांचे अर्धशतक पार केले, पण लोण मात्र एक-एकच नोंदविला गेला. शेवटच्या सामन्यात आकांक्षा मंडळाने यश मंडळाला ३६-२५ असे नमवित आगेकूच केली. विश्रांतीला १६-११ अशी आकांक्षाकडे आघाडी होती. स्वप्नील पाटील, व्यंकट साळुंखे आकांक्षाकडून, तर सिद्धार्थ कतरे, केतन चौगुले यश मंडळाकडून उत्कृष्ट खेळले.
या स्पर्धेला अर्जुन पुरस्कार प्राप्त माया मेहेर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आशा गायकवाड (चव्हाण) व गणेश शेट्टी, तसेच राष्ट्रीय खेळाडू राणा तिवारी, सचिंद्र आयरे, सणस यांनी सदिच्छा भेट दिली.