
मुंबई ः मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन बोरिवली आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहयोगाने १० व्या एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने मुंबईच्या नीलांश चिपळूणकरवर २५-५, २५-१ अशी मात करून आगेकूच केली.
उप उपांत्यपूर्व सामन्यात नीलांश चिपळूणकरने माजी विश्व विजेत्या प्रशांत मोरे याला सरळ दोन सेटमध्ये हरवून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु अनुभवी सागर समोर तो अगदी निष्प्रभ ठरला. महिला एकेरीच्या उप उपांत्य सामन्यात पालघरच्या श्रुती सोनावणे हिने रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ५-२५, २०-१५ व २४-२३ असा चुरशीचा विजय मिळवून आगेकूच केली. तिसऱ्या सेटमध्ये आठव्या बोर्डनंतर दोनही खेळाडूंचे २३-२३ असे सामान गुण झाल्याने नववा बोर्ड खेळविण्यात आला. नवव्या बोर्डात नाणेफेक जिंकल्याने श्रुतीला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. हा अंतिम व अतिरिक्त बोर्ड शेवटपर्यंत रंगला आणि केवळ एक गुण मिळवत श्रुतीने या सामन्यात निसटता विजय प्राप्त केला. नुकत्याच शिव छत्रपती पुरस्काराने गौरविलेल्या आकांक्षासाठी हा अनपेक्षित धक्का आहे.
पुरुष एकेरी गटाचे महत्त्वाचे निकाल
प्रफुल मोरे (मुंबई) विजयी विरुद्ध ओंकार टिळक (मुंबई), महम्मद घुफ्रान (मुंबई) विजयी विरुद्ध संजय मणियार (मुंबई उपनगर), पंकज पवार (ठाणे) विजयी विरुद्ध समीर अन्सारी (ठाणे).
महिला एकेरी गट निकाल
अंबिका हरिथ (मुंबई) विजयी विरुद्ध ऐशा साजिद खान (मुंबई), प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध रिंकी कुमारी (मुंबई), मिताली पाठक (मुंबई) विजयी विरुद्ध समृद्धी घाडीगावकर (ठाणे).