
माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते जोसेफचा सत्कार
पुणे ः महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावणारा जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथील आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील तिसरा खेळाडू रेनॉल्ड जोसेफ याचा सत्कार माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते पुणे शहर संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे १९९३ साली तत्कालीन बॉक्सिंग प्रशिक्षक आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव भरतकुमार व्हावळ यांनी रमेशदादा बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रातील असंख्य खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. सदर ठिकाणी प्रशिक्षण घेऊन अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके पटकावणाऱ्या गिरीश पवार यांना २००५- ०६ या वर्षी महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले होते.
त्यानंतर बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय गुजर यांनी या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षकाची जबाबदारी घेतली. कालांतराने माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे व नगरसेवक अविनाश बागवे यांच्या प्रयत्नाने या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे अतिशय सुसज्ज अशा “क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रा”मध्ये रूपांतर करण्यात आले. बॉक्सिंग कोच विजय गुजर यांच्या प्रशिक्षणाने सुद्धा असंख्य बॉक्सिंग खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले. या प्रशिक्षण केंद्रातील दुसरा शिवछत्रपती पुरस्कार अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके पटकावणाऱ्या सलमान शेख यास २०१५-१६ या वर्षांकरिता व त्यानंतर तिसरा पुरस्कार रेनॉल्ड जोसेफ यास २०२२-२३ या वर्षांकरिता मिळाला.
या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेता रेनॉल्ड जोसेफ याचे कोच विजय गुजर व रेनॉल्ड जोसेफ याचे आई-वडील यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे रिंग ऑफिशियल चेअरमन सुरेशकुमार गायकवाड, शहर संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सलमान शेख, बॉक्सिंग कोच उमेश जगदाळे, पंच प्रदीप वाघे, राष्ट्रीय बॉक्सर अक्षय मानकर, रोहित चव्हाण आदी मान्यवर तसेच पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अनेक खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.