
मुंबई ः माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र-कामगार दिनानिमित्त १ मेपासून ४ दिवस होणाऱ्या विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या सांघिक सुपर लीग कॅरम स्पर्धा पूर्व तयारीच्या सराव मार्गदर्शन शिबिरात उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू नील म्हात्रे, सारा देवन, देविका जोशी यांनी सर्वोत्तम प्रशिक्षणार्थींचा पुरस्कार पटकाविला. ज्येष्ठ कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर, संतोष जाधव, अविनाश महाडिक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी शालेय खेळाडूंना मार्गदर्शन केले.
सुमती सेवा मंडळाचे क्रीडा प्रमुख प्रमोद पार्टे, क्रीडा शिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेल्या मोफत मार्गदर्शन व सराव शिबिरातील स्पर्धात्मक निर्णायक फेरीमध्ये नील म्हात्रेने सारा देवनला ८-४ असे चकविले. यावेळी आनंदराव प्लॅटीनियम, गोविंदराव फायटर्स, कॅप्टन अभिजित, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, एमडीसी ज्वेलर्स, सिबिईयु वॉरीयर्स, सुमती क्वीन, फेअर प्ले, अविनाश नलावडे स्पोर्ट्स, दिलीप स्ट्रायकर्स, राणे ऑप्टीशीयंस, सुरेश फिनिशर्स आदी संघातील विविध जिल्ह्यामधील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ३६ खेळाडू जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा १ ते ४ मे दरम्यान दादर-पश्चिम येथील को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात १२ संघांमध्ये साखळी सामन्यांद्वारे रंगणार आहेत. पूर्णपणे विनाशुल्क असलेल्या कॅरम उपक्रमात शालेय खेळाडूंना टी शर्ट, स्ट्रायकर, पुरस्कार दिले जाणार असून तज्ञांचे मार्गदर्शन देखील मोफत लाभणार आहे.