
मुंबई ः मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन बोरिवली आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहयोगाने १० व्या एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटात महम्मद घुफ्रान आणि महिला गटात प्राजक्ता नारायणकर यांनी विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने ठाण्याच्या पंकज पवार याला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करून विजेतेपद संपादन केले आणि रुपये २५ हजारांची कमाई केली. फार्मात असलेल्या पंकजने पहिल्या सेटमध्ये सहाव्या बोर्डात व्हाईट सलामीची नोंद करत पहिला सेट सहज जिंकला होता. परंतु संयमी खेळाच्या जोरावर पुढील दोनही सेट घुफ्रानने जिंकून आपली ताकद दाखवून दिली. अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या घुफ्रानने उपांत्य लढतीत पुण्याच्या सागर वाघमारेवर तर पंकजने मुंबईच्या प्रफुल मोरेवर मात केली होती. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत विजय मिळवताना सागर वाघमारे याने मुंबईच्या प्रफुल मोरे याला नमवले.
महिला एकेरीच्या अंतिम लढतीत आपले पहिले राज्यस्तरीय विजेतेपद पटकावताना मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकर हिने मुंबईच्या अंबिका हरिथवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत निसटता विजय प्राप्त केला आणि रोख रुपये ८ हजारांचे ईनाम काबीज केले. प्राजक्ताने उपांत्य लढतीत मुंबईच्या मिताली पाठकवर विजय मिळवला होता. तर अंबिका पालघरच्या श्रुती सोनवणेवर सरळ मात केली होती. या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मितालीने बाजी मारली. तिने श्रुतीला हरवले.
विजेत्या खेळाडूंना एमसीएफचे मानद अध्यक्ष सीए निहार जांबुसराइया, मानद सचिव सतीश शर्मा, उपाध्यक्ष चंद्रकांत लालन, माजी अध्यक्ष हरीश छेडा, कार्यकारिणी सदस्य हेमल शहा राज्य कॅरम संघटनेचे मानद सचिव अरुण केदार यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य महर्षी देसाई यांनी केले.