सहाव्या विजयासह गुजरातची आघाडी कायम 

  • By admin
  • April 21, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

केकेआर घरच्या मैदानावर ३९ धावांनी पराभूत; शुभमन गिल, साई सुदर्शनची शतकी भागीदारी निर्णायक

कोलकाता : कर्णधार शुभमन गिल (९०) व साई सुदर्शन (५१) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने गतविजेत्या केकेआर संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर ३९ धावांनी पराभूत केले. या विजयासह गुजरातने सहाव्या विजयासह १२ गुणांची कमाई करत गुणतालिकेत आघाडीचे स्थान भक्कम केले. केकेआर संघाचा हा पाचवा पराभव ठरला. 

घरच्या मैदानावर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआर संघासमोर विजयासाठी १९९ धावांचे आव्हान होते. केकेआर संघाला पाचव्या चेंडूवर पहिला धक्का बसला. सिराज याने गुरबाज याला (१) पायचीत बाद केले. या धक्क्यातून सावरत असताना सुनील नरेन (१७) बाद झाला. व्यंकटेश अय्यर १९ चेंडूत १४ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याला एकही षटकार व चौकार मारता आला नाही. जोपर्यंत खेळपट्टीवर होता तोपर्यंत त्याला सहजपणे खेळता आले नाही. 
एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना कर्णधार अजिंक्य रहाणे याने अवघ्या ३६ चेंडूत ५० धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी साकारली. आघाडीच्या फळीत अजिंक्य रहाणे हाच एकमेव फलंदाज झुंजत होता. रहाणे याने पाच चौकार व एक षटकार मारला. वॉशिंग्टन सुंदर याने व्यंकटेश अय्यर व रहाणे यांना बाद करुन केकेआर संघाला बॅकफूटवर ढकलले. 

१२.३ षटकात ९१ धावांवर केकेआरने चार फलंदाज गमावले होते. केकेआर संघावर धावगतीचे वाढते दडपण होते. रिंकू सिंग व आंद्रे रसेल हे धमाकेदार फलंदाज मैदानात उतरले. या जोडीकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, रशीद खानला उत्तुंग षटकार मारण्याच्या प्रयत्नात रसेल यष्टीचीत बाद झाला. त्याने १५ चेंडूत २१ धावा काढल्या. त्यात त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्ण याने रमणदीप (१) आणि मोईन अली (०) यांना स्वस्तात बाद करुन केकेआर संघाच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. रिंकू सिंगची १७ धावांची खेळी इशांत शर्मा याने संपुष्टात आणली. अंगकृष्ण रघुवंशी याने १३ चेंडूत नाबाद २७ धावा फटकावल्या. केकेआर संघाने २० षटकात ८ बाद १५९ धावा काढल्या. प्रसिद्ध कृष्णा (२-२५), रशीद खान (२-२५) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सिराज, इशांत, सुंदर, साई किशोर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 
  
शुभमन-सुदर्शनची बहारदार फलंदाजी 

कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या बहारदार अर्धशतकांच्या मदतीने गुजरात टायटन्सने केकेआरसमोर विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य ठेवले. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु गिल आणि सुदर्शन यांनी गुजरातसाठी शतकी भागीदारी केली, ज्यामुळे संघ २० षटकांत तीन गडी गमावून १९८ धावा करू शकला. गुजरातकडून गिलने ५५ चेंडूत १० चौकार आणि तीन षटकारांसह ९० धावांची सर्वाधिक धावसंख्या उभारली, तर सुदर्शनने ३६ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा काढून बाद झाला.

प्रथम फलंदाजी करताना गिल आणि सुदर्शन या जोडीने गुजरातला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. गिलने ३४ चेंडूत आणि सुदर्शनने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सुदर्शनचे हे या हंगामातील पाचवे आणि गिलचे तिसरे अर्धशतक होते. गिल आणि सुदर्शन यांच्यातील ही भागीदारी आंद्रे रसेलने मोडली. सुधरसन बाद झाल्यानंतर जोस बटलर क्रीजवर आला आणि गिल समवेत त्याने गुजरातच्या डावाला गती दिली. गिलने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली पण शतक झळकावण्यात तो कमी पडला. यादरम्यान, गिल आणि बटलरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी झाली जी वैभव अरोराने मोडली. गिल ९० धावांवर बाद झाला. त्याचे शतक केवळ १० धावांनी हुकले. गिलने १० चौकार व ३ षटकार मारले. 

त्यानंतर, हर्षित राणाने राहुल तेवतियाला खाते न उघडताच बाद करून गुजरातला तिसरा धक्का दिला. बटलर आणि शाहरुख खानने शेवटी वेगवान खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु केकेआरने गुजरातला २०० धावा करण्यापासून रोखण्यात यश मिळवले. गुजरातकडून बटलरने २३ चेंडूत आठ चौकारांसह ४१ धावा काढल्या, तर शाहरुखने पाच चेंडूत एका षटकारासह ११ धावा काढल्या. केकेआरकडून वैभव अरोरा, हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *