
पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत भारताची अव्वल महिला बुद्धिबळ पटू कोनेरू हम्पी हिने अत्यंत रंगतदार लढतीत चीनच्या झू जीनरचा पराभव करून सातव्या फेरी अखेर आघाडीच्या स्थानावर झेप घेतली.

अमनोरा द फर्न येथे सुरू असलेल्या स्पर्धेत कोनेरू हम्पी आता ५.५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून आधीच्या फेरीपर्यंत पहिल्या स्थानावर असलेली झू जीनर आणि सातव्या फेरीत मुनगुंतूल बॅट खुयाकवर विजय मिळवणारी दिव्या देशमुख या दोन खेळाडू प्रत्येकी ५ गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. संपूर्ण राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आता केवळ दोन फेऱ्या बाकी असल्यामुळे हम्पी, झू जीनर व दिव्या देशमुख या तिघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताच्या वैशाली रमेशबाबू व हरिका यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्या विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत.
त्याआधी हम्पी हिने झू जीनर विरुद्ध तिच्या आवडत्या इंग्लिश ओपनिंग पद्धतीने डावाची सुरुवात केली नाही व झू जीनरला चकित केले. हम्पी हिने अनपेक्षित रित्या क्वीन्स इंडियन डिफेन्स पद्धतीने डावाचा वेगवान प्रारंभ केला. मात्र, डावाच्या मध्यापर्यंत दोघींनीही बरोबरीच्या चाली करत पटावरील स्थिती समसमान राखली.
हम्पीची स्थिती थोडीशी वरचढ असल्याचे दिसत असताना ३०व्या चालीत तिने हलवलेला घोडा तिची व्यूव्हरचना कमकुवत करणारा ठरला. यावेळी हम्पीकडे दोन उंट व वजीर आणि जीनरकडे दोन घोडे व वजीर अशी फौज शिल्लक होती. हम्पीकडे चाली करण्यासाठी कमी वेळ बाकी असल्यामुळे झू जीनर हिने वेगवान चाली करत तिच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झू जीनर हिचा घोडा हम्पीच्या क्षेत्रात खोलवर घुसला होता. पाठोपाठ तिने वजीराची आगेकूच कायम राखली. मात्र ४४व्या चालीत केलेल्या चुकीमुळे झू जीनरला तिचा घोडा गमवावा लागला.
यावेळीही झू जीनर कडे हम्पी पेक्षा जास्त वेळ शिल्लक होता. तरीही हम्पीने वजीर व घोड्याच्या साहाय्याने जीनरच्या वजीराची कोंडी केली. झू जीनर हिने यावेळी वजीराच्या सहाय्याने आक्रमण केले. मात्र, हम्पी हिने वजीराची मारामारी करत तिचे डावपेच मोडून काढले. झू जीनरचा दुसरा घोडा ही हम्पीने मारल्यानंतर ५५व्या चालीला तिने शरणागती पत्करली
चौथ्या पटावरील लढतीत भारताच्या दिव्या देशमुख विरुद्ध मंगोलियाच्या मुनगुंतूल बॅट खुयाकने स्लाव्ह बचावाने डावाची सुरुवात केली. मात्र, पराभवाची हॅटट्रिक पत्करणाऱ्या मुनगुंतूलचा आत्मविश्वास अजूनही फारसा उंचावला नसल्याचे पाहून दिव्याने पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली. तिने सुरुवातीलाच वजीराच्या बाजूला कॅसलिंग करून हत्ती समोरचे प्यादे सातव्या रांगेपर्यंत पुढे घुसवले.
मुनगुंतूलने राजाच्या बाजूला प्रतिआक्रमण करून दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिव्या हिने सातत्याने आक्रमण करत दडपण वाढवत नेले. मुनगुंतूलच्या राजाच्या बाजूचा घोडा अडकून बसल्यापासून दिव्या हिने वजीराच्या बाजूने आक्रमण करत वजीराची मारामारी करत अनेक मोहरी मारली.
यावेळी मुनगुंतूलची बचाव फळी सुद्धा मागे रेटली गेली होती. दिव्याची दोन प्यादी दोन्ही बाजूने सातव्या रांगेपर्यंत पोहोचल्यावर व ती दोन्ही प्यादी वजीर होण्याची चिन्हे दिसताच मुनगुंतूलने ४७व्या चालीला शरणागती पत्करली. विजयानंतर दिव्या म्हणाली की, २० चाली नंतरच मला विजयाची संधी असल्याचे ध्यानात आले होते आणि तीच सकारात्मकता मी पुढे कायम ठेवली. त्यामुळे मला हा विजय मिळवता आला.
पाचव्या पटावरील लढतीत भारताची हरिका द्रोणावल्ली आणि रशियाची पोलिना शुव्हालोवा यांच्यातील लढत ४३व्या चालीनंतर बरोबरीत सुटली. हरिका हिने या डावात पेट्रॉफ बचावाने प्रारंभ केला होता. मात्र, पोलिनाने तितक्याच भक्कमपणे व्यूव्हरचना करून तिला चोख उत्तर दिले. दोन्ही खेळाडूंनी नियमित अंतराने एकमेकींची महत्त्वाची मोहरी मारली. मात्र, डावाच्या अखेरीस दोन्ही खेळाडूंकडे परस्पर विरुद्ध रंगाचे उंट आणि समान संख्येने प्यादी इतकाच फौज फाटा शिल्लक राहिल्यामुळे ४३व्या चाली नंतर सामना बरोबरीत सुटला.