
पुणे ः नवी दिल्ली येथे २५ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आशियाई योगासन स्पर्धेसाठी पुण्याच्या गार्गी योगेश भट हिची भारतीय संघामध्ये निवड झाली आहे आणि ती सब ज्युनियर गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल.
गार्गी भट हिने आतापर्यंत योगासनामध्ये राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये नऊ सुवर्ण, पाच रौप्य, तीन कांस्य अशी सतरा पदके जिंकली आहेत तर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने सहा सुवर्ण, एक रौप्य व पाच कांस्य अशी एक डझन पदकांची कमाई केली आहे. गार्गी ही रविभूषण कुमठेकर, स्वप्नील जाधव आणि अश्विनी भट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. गार्गी ही अभिनव इंग्लिश स्कूल सीबीएससी नऱ्हे या शाळेमध्ये इयत्ता दहावी शिकत आहे. तिने लहानपणी जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारातही शालेय व अन्य स्पर्धांमध्ये भरघोस पदके मिळवली होती.
गार्गी तिचे वडील योगेश हे राष्ट्रीय खो-खोपटू असून त्यांनी पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघातर्फे अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती.