
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पटकावली पाच पदके
मुंबई ः कोटा (राजस्थान) येथे नुकत्याच झालेल्या अंडर २० राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत साई एनसीओई मुंबई केंद्राच्या कुस्तीपटूंनी शानदार कामगिरी नोंदवत पाच पदके पटकावली. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य पदकांचा समावेश आहे.
कोटा (राजस्थान) या ठिकाणी अंडर २० राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत साई एनसीओई मुंबई केंद्राच्या कुस्तीपटूंनी सहभाग घेत घवघवीत यश संपादन केले.
महिला गटात ६२ किलो वजन गटात प्रगती गायकवाड हिने सुवर्णपदक पटकावले. ग्रीको-रोमन प्रकारात ६० किलो वजन गटात समर्थ महाकवे याने रौप्यपदक जिंकले. नीरज पटेल याने ग्रीको-रोमन प्रकारात ५५ किलो वजन गटात रौप्यपदकाची कमाई केली. अर्जुन गाडेकर याने कांस्यपदक जिंकले. त्याने ही कामगिरी फ्रीस्टाइल प्रकारात ८६ किलो वजन गटात केली. ग्रीको-रोमन प्रकारात ७२ किलो वजन गटात महेश राठोड याने कांस्यपदक जिंकले. या शानदार कामगिरीबद्दल साई एनसीओई मुंबई केंद्राचे संचालक पांडुरंग चाटे यांनी पदक विजेत्या कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.