
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ मकरंद जोशी, आर्य शहा यांची निवड
छत्रपती संभाजीनगर ः सुझुकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा छत्रपती संभाजीनगरचा खेळाडू आर्य शहा व आंतरराष्ट्रीय पंच डॉ मकरंद जोशी यांची भारतीय संघात निवड करण्यात आली. २५ ते २७ एप्रिल या कालावधीत टोकियो, जपान येथे सुझुकी एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल दी जिम्नॅस्टिक्स एफआयजी, तसेच इंटरनॅशनल एरोबिक्स फेडरेशन, जपान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता भारतातून रुद्राक्ष खन्ना (सब ज्युनियर गट पुरुष एकेरी, जम्मू काश्मीर), मूथूम रोमेष (ज्युनियर गट पुरुष एकेरी, मणिपूर), आर्य शहा (पुरुष एकेरी, महाराष्ट्र), मीत कोसंबीया (सीनियर गट पुरुष एकेरी गुजरात), रिया शर्मा (ज्युनियर गट महिला एकेरी, जम्मू काश्मीर) व अरीहा पानगंबम (सीनियर गट महिला एकेरी, मणिपूर) या ६ खेळाडूंची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे. या संघा बरोबर प्रशिक्षक म्हणून शशांक बिडीवला (गुजरात), एस पी सिंग (जम्मू कश्मीर) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या संघा बरोबर संघप्रमुख व पंच म्हणून डॉ मकरंद जोशी तसेच संघ व्यवस्थापक म्हणून युमनाम रंजन यांची निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच फिलिपाईन्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत डॉ मकरंद जोशी यांनी सातव्यांदा ऑलिम्पिक सायकल मधील पंच परीक्षेत कॅटेगिरी थ्री प्राप्त करून भारतातील सर्वात अनुभवी पंच म्हणून पात्रता मिळवली. सलग तिसऱ्या वर्षी त्यांची जागतिक चषक स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे या संघास मारुती सुझुकी इंडिया प्रा लि दिल्ली यांनी पुरस्कृत केले आहे. एरोबिक जिम्नॅस्टिक्स भारतीय संघाला तिसऱ्यांदा अशा पद्धतीने संपूर्णपणे स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.
या स्पर्धेकरिता जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, कोषाध्यक्ष कौशिक बिडीवाला, मारुती सुझुकीचे साईटो सॅन, नायोटो ताकाहाशी सॅन, ताकेशीता सॅन, अविनाश मोहंती, विशाल शर्मा, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या उपसंचालक डॉ मोनिका घुगे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ सागर कुलकर्णी, डॉ विशाल देशपांडे, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहित रोंघे, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, तनुजा गाढवे यांनी सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.