
दहावी मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग ः अजित यादवची प्रभावी गोलंदाजी
मुंबई : ठाणे मराठाज संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसी आयोजित १०व्या मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग स्पर्धेच्या सुपर लीग सामन्यात बुधवारी शिवाजी पार्क वॉरियर्स संघाला पराभवाचा धक्का दिला.
एमसीएच्या निवड चाचणीमुळे तासभर उशिरा सुरू झालेली लढत प्रत्येकी १७ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे मराठाज संघाने नाणेफेक जिंकून शिवाजी पार्क वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि १७ षटकांत त्यांचा डाव १४५ धावांत गुंडाळला. सुवेद पारकर पुन्हा एकदा झटपट तंबूत परतल्यानंतर वरून लवंडेने मात्र आक्रमक खेळ करताना २० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार ठोकत ४९ धावा केल्या. त्यांच्या सिद्धांत सिंग (२६), देव पटेल (१८) आणि आश्रय सजणानी (१८) यांनी देखील संघाच्या धावसंख्येत खारीचा वाटा उचलला. ठाणे मराठाज संघासाठी ऑफ स्पिनर अजित यादव प्रभावी ठरला. त्याने केवळ १८ धावांत ३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविला. त्याला मध्यमगती आदित्य राणे (३५/३) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज दिव्यांश सक्सेना (२५/२) यांनी चांगली साथ दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना शाश्वत जगताप (२९) आणि ह्रिदय खांडके (१९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली, पण ८८ धावांत त्यांचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. त्यावेळी सिद्धांत अधटराव (३२) आणि चिन्मय सुतार (१०) यांनी पाचव्या विकेटसाठी ३२ धावांची भागी रचून डाव सावरला. शेवटी विनय कुमारने (नाबाद २३) शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑफ स्पिनर देव पटेलने १८ धावांत २ तर डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिक मिश्राने २६ धावांत २ बळी मिळविले. सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अजित यादव याची निवड करण्यात आली आणि सामनाधिकारी सुरेंद्र नागवेकर यांच्या हस्ते धनादेश देऊन त्याला गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक ः शिवाजी पार्क वॉरियर्स ः १७ षटकांत सर्वबाद १४५ (वरून लवंडे ४९, सिद्धांत सिंग २६, देव पटेल १८, आश्रय सजणानी १८; आदित्य राणे ३५ धावांत ३ बळी,अजित यादव १८ धावांत ३ बळी, दिव्यांश सक्सेना २५ धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध ठाणे मराठाज ः १७ षटकांत ८ बाद १५१ (शाश्वत जगताप २९, ह्रिदय खांडके १९, सिद्धांत अधटराव ३२, विनय कुमार नाबाद २३; देव पटेल १८ धावांत २ बळी, कार्तिक मिश्रा २६ धावांत २ बळी). सामनावीर ः अजित यादव