
जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजन, विशाल लाड ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू.
मुंबई ः लोअर परेलच्या शिवमुद्रा प्रतिष्ठानने जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक १९३ पुरस्कृत वसंतशेठ नागवेकर चषक कुमार गट कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
शिवमुद्राचा विशाल लाड ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. त्याला एलईडी टीव्ही देऊन गौरविण्यात आले. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जुनी प्रभादेवी येथील शीला खाटपे मॅटच्या क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानने दादरच्या आकांक्षा क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३९-११ असा सहज मोडून काढत वसंतशेठ नागवेकर चषक व रोख अकरा हजार रुपयांचा पुरस्कार आपल्या खात्यात जमा केला. उपविजेत्या आकांक्षा मंडळाला चषक व रोख सात हजारांवर समाधान मानावे लागले. पहिली पाच मिनिटे वगळता सामना एकतर्फीच झाला. आक्रमतेवर भर देत शिवमुद्राच्या विशाल लाड याने १२व्या मिनिटाला शिलकी दोन गडी टिपत आकांक्षावर पहिला लोण देत १५-०४ अशी आघाडी घेतली. याच सत्रात १७व्या मिनिटाला दुसरा लोण देत २५-०९ अशी आपली आघाडी भक्कम केली. याच गुण फलकावर मध्यांतर झाला.
मध्यांतरानंतर तिसरा लोण देत ३५-११ अशी आघाडी घेतली आणि आकांक्षाच्या गोटातील हवाच काढून घेतली. शिवमुद्राच्या विशाल लाडाच्या तुफानी चढाया रोखण्यात आकांक्षाला अपयश आले. त्यातच आकांक्षाचा हुकमी खेळाडू स्वप्नील पवार गुण मिळविण्यात अयशस्वी ठरला. त्यांचा बचाव ही या सामन्यात दुबळा ठरला. विशाल लाड याच्या झंझावाती चढाया त्याला राकेश दाणीची पकडीची मिळालेली भक्कम साथ त्यामुळे शिवमुद्रा संघाने हा मोठा विजय मिळविला. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात शिवमुद्राने अमर मंडळाला ४५-२९ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली. पण आकांक्षाला मात्र अंतिम फेरी गाठण्यासाठी झगडावे लागले. आकांक्षाने पूर्वार्धातील ०६-२० अशा १४ गुणांच्या पिछाडीवरून पूर्ण डावात २९-२९ अशी, ५-५ चढायांच्या डावात ३४-३४ अशी बरोबरी केली. सुवर्ण चढाईत स्वप्नील पवारने चढाईत २ गडी टिपत संघाला अंतिम फेरी गाठून दिली. हा खेळ पाहून अंतिम लढत रंगदार होईल असा क्रीडा रसिकांचा होरा होता. पण त्यांची निराशा झाली.
स्पर्धेतील दोन्ही उपांत्य उपविजयी संघाना प्रत्येकी चषक व रोख पाच हजार रुपये प्रदान करण्यात आले. आकांक्षाचा स्वप्नील पवार आणि नवोदित संघाचा अथर्व सुवर्णा अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी टेबल फॅन देऊन सन्मानित करण्यात आले. गोलफादेवी सेवा मंडळाला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आले. यानिमित्ताने महिलांचा प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. त्यात ओम ज्ञानदीप मंडळाने चंद्रोदय मंडळाचा १८-१७ असा पाडाव केला. अंतिम दिवशी आमदार सुनील शिंदे, लालबागच्या राजाचे सचिव व शिवसेनेचे सचिव सुधीर साळवी यांनी भेट दिली. पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, डॉ सुमित लहाने, संकेत नागवेकर, एसीपी राजू तेजाळे, श्रीराम साळगावकर, निशिकांत शिंदे, निरंजन नलावडे, संघटनेचे अध्यक्ष व स्पर्धा आयोजक संजय भगत, कार्याध्यक्ष राजेंद्र परब, सचिव सुरेश चित्रे, स्पर्धा प्रमुख समीर बिडू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.