
हैदराबाद संघाचा सात विकेटने पराभव; रोहित शर्माची तुफानी फलंदाजी, बोल्टची शानदार गोलंदाजी
हैदराबाद : रोहित शर्मा (७०), ट्रेंट बोल्ट (४-३६) यांच्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय साकारला. मुंबईने सलग चौथा विजय साकारत १० गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी १४४ धावांचे लक्ष्य होते. मुंबईला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. जयदेव उनाडकट याने रायन रिकेलटन याला ११ धावांवर बाद केले. त्यानंतर अनुभवी रोहित शर्मा व विल जॅक्स या जोडीने धमाकेदार फलंदाजी करत संघाचा विजय सुकर बनवला. रोहित शर्मा याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत पुन्हा एकदा बहारदार आक्रमक अर्धशतक ठोकले. रोहित-जॅक्स जोडीने ६४ धावांची भागीदारी केली. जॅक्स १९ चेंडूत २२ धावा काढून बाद झाला. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला.
खास करुन रोहित शर्मा याने आपल्या तुफानी फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांमध्ये जोश भरला. रोहितने चौफेर टोलेबाजी करुन चौकार व षटकार वसूल केले. रोहितने तुफानी फलंदाजी करत सूर्यकुमार यादव समवेत ५३ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. विजयासाठी काही धावांची गरज असताना रोहित ७० धावांची वादळी खेळी करुन बाद झाला. रोहितने ४६ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. त्यानंतर सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या जोडीने संघाचा दणदणीत विजय साकारला. सूर्यकुमार यादव याने १९ चेंडूत नाबाद ४० धावांची दमदार खेळी केली. त्याने पाच चौकार व दोन षटकार मारले. तिलक वर्माने नाबाद २ धावांचे योगदान दिले. मुंबईने १५.४ षटकात तीन बाद १४६ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला. जयदेव उनाडकट (१-२५), इशान मलिंगा (१-३३), झीशान अन्सारी (१-३६) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हैदराबादची फलंदाजी गडगडली

हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांच्यातील ९९ धावांच्या मोठ्या भागीदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबईसमोर १४४ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने २० षटकांत आठ गडी गमावून १४३ धावा केल्या. त्यांच्याकडून क्लासेनने ७१ धावा आणि अभिनवने ४३ धावा केल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने २६ धावांत चार तर दीपक चहर याने १२ धावांत दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, बुमराहने त्याच्या नावावर यश मिळवले.
या सामन्यात हैदराबादची सुरुवात खराब झाली. हैदराबाद संघाने २० पेक्षा कमी धावसंख्येत चार विकेट गमावल्या. ट्रॅव्हिस हेड (०), अभिषेक शर्मा (८), इशान किशन (१) आणि नितीश रेड्डी (२) मोठे धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. त्यानंतर, हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ९९ धावांची मोठी भागीदारी झाली. क्लासेनने या आयपीएलमधील पहिले अर्धशतक ३४ चेंडूत पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूत ७१ धावांची वैयक्तिक धावसंख्या उभारली क्लासेनने दोन षटकार व नऊ चौकार मारले. त्याच वेळी, प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या अभिनव मनोहरने ३७ चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. अनिकेत वर्माने १२, पॅट कमिन्सने १ आणि हर्षल पटेलने नाबाद १ धावा केल्या.